Pune News पुणे : पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये सिमेंट काँक्रिट करण्यात आले आहे, त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर आल्याने रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी जिरविण्यासाठी चर खोदावे लागतील असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील पूरस्थितीचे प्रशासनाने सोसायट्यांवरच खापर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहराला गेल्या आठवड्यात दोन वेळा पावसाने झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या तासात शहरातील पावसाळी गटारांची क्षमता संपली. त्यामुळे रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत, तर काही ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी तुंबले. अनेक घरांत, दुकानांत पाणी घुसले, दुचाकी वाहून गेल्या, चारचाकी बुडाल्या.
शहरात दाणादाण उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बांधकामासाठी वळविले गेलेले नाले, नाले बुजवून करण्यात आलेले अतिक्रमण, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता न करणे, त्यामधून ऑप्टिकल फायबर केबल टाकणे, यांमुळे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी नुकताच पूरस्थितीचा आढावा घेतला. त्याबद्दल ते म्हणाले, शहरात नाले बुजवून, वळवून बांधकामे करण्यात आली आहेत, अतिक्रमण केली आहेत. त्यामध्ये सुधारणा केली जाईल. शहरात पाणी तुंबल्यानंतर महापालिकेची यंत्रणा त्वरित कार्यान्वित झाली होती. जास्त पाणी तुंबलेल्या ठिकाणी लगेच उपाययोजना सुरू केल्या आहेत. सोसायट्यांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे तेथील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी चर खोदून पाणी जिरविण्याची व्यवस्था करावी लागेल.
शहरात मुसळधार पाऊस पडत असताना संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडून लक्ष ठेवले जात होते. पण त्यातून समन्वय ठेवला जात नव्हता. त्यामध्ये आता आयुक्तांनी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्यांनी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांशी समन्वय ठेवून काम करावे.
जास्त पाऊस झालेल्या भागात त्वरित मदत पोहोचविणे, त्यासंदर्भात आदेश देणे, अशी कामे या उपायुक्तांना करावी लागणार आहेत. रोज रात्री एका उपायुक्त स्तरावरचा अधिकारी या ठिकाणी नियुक्त असणार आहे, असे आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.