Pune News पुणे : दौंड ते गार (ता. श्रीगोंदा, जि. नगर) दरम्यान भीमा नदीवरील पुलासाठी दौंड शहराच्या बाजूने पोच रस्ता अद्याप निश्चित झाला नसल्याची बाब समोर आली आहे. पुलाच्या मंजुरीसाठी दाखविलेल्या पोच रस्त्यावर पक्क्या बांधकामांची अतिक्रमणे असल्याने तूर्तास पोच रस्ता न करता पुलाचे बांधकाम सुरू आहे.
भीमा नदीवर दौंड ते गार दरम्यान एकूण १९ कोटी ९९ लाख रुपये खर्च असलेल्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. निकृष्ट बांधकामामुळे ९ जून रोजी दोन खांब पायासकट नदी पात्रात कोसळले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे खांब कलल्याने ते पाडून टाकण्याचा निर्णय झाला होता व तसे कंत्राटदाराला कळविण्यात आले होते, असा दावा केला.
दरम्यान, दौंड शहरातून पुलाकडे जाण्यासाठी ५४० मीटर अंतराचा, तर गार बाजूने ५०० मीटरचा पोच रस्ता प्रस्तावित आहे. गार बाजूचा रस्ता निश्चित असताना दौंड बाजूचा रस्ता निश्चित झालेला नाही.
दौंड शहराच्या दिशेने पुलाच्या खांबांचे बांधकाम संपते तेथून पुढे लिंगायत स्मशानभूमी व स्मशानभूमीची संरक्षक भिंत आहे. पुलाच्या खांबाला लागून शासकीय जागेतील वीटभट्ट्या, खासगी स्मशानभूमी, मंत्री छत्री आणि काही दगडी समाध्या आहेत. पोच रस्ता कुंभार गल्लीच्या रस्त्याला जोडला जाणार असून, पुढे तो दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गावरील पंडित नेहरू चौकास जोडला जाणार आहे. परंतु, या रस्त्यावर अतिक्रमणे असून नगरपालिका अतिक्रमणे काढण्यास धजावत नाही, ही सद्यःस्थिती आहे.
या बाबत दौंड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एम. आर. सोनवणे यांना विचारले असता त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या रस्त्यासंबंधी मार्ग काढला जाईल, असे सांगितले.
पुलाची एकूण लांबी ३२० मीटर असून, दौंड बाजूने पोच रस्ता ५४० मीटर दाखविण्यात आल्याने तेवढे अंतर पार करून त्या गतीने धावणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक चढ आणि उतार कोठून करणार? याविषयी संभ्रम आहे. या पुलावरून प्रवासी वाहनांसह ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर- ट्रॅाली व अन्य अवजड वाहनांची वाहतूक प्रस्तावित आहे.
एका बाजूचा रस्ता निश्चित नसतानाही पुलास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्याने मंजुरी प्रक्रियेची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.