Pune News पुणे : जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याच्या (Khadakwasla Cannel) इंदापूर तालुक्यातील वितरिका दुरुस्तीसाठी ५१ कोटी ८५ लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सुटले नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी भगवान खारतोडे यांनी दिला होता. खारतोडे यांनीच वरील माहिती दिली.
खारतोडे हे निरगुडे (ता. इंदापूर) येथील तलाठी कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, जलसंपदा विभागांसंदर्भात जे विषय प्रलंबीत आहेत ते मार्गी लावण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने आठ मागण्यांपैकी एक मागणी खडकवासला वितरिका क्र. ४१ पासून वितरिका क्र. ६० ब पर्यंत दुरुस्ती करणे ही मागणी मान्य झाली आहे. त्याला व इतर खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीसाठी तसेच १४६ किलोमीटर ते २०२ किलोमीटर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून (एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या) माध्यमातून दुरुस्तीसाठी ५१ कोटी ८५ लाख रुपये इतक्या निधीची तरतूद केली आहे, असे खारतोडे यांनी सांगितले.
आपण केलेल्या इतर सात मागण्यांचा विचार वरिष्ठ पातळीवर होऊन त्याला न्याय देण्याचे काम प्रशासनाने करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी भगवान खारतोडे यांनी केली आहे. त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.