Pune News पुणे : प्रतिनियुक्तीवर आलेल्या सचिव व सहसचिवांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी - MPSC) कारभार विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून, आयोगाचे अंतर्गत राजकारणासाठी कारणीभूत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. परीक्षांबद्दल तब्बल १८ प्रश्नांचा पाढाच उमेदवारांनी वाचला.
वादग्रस्त सरळसेवा भरती, कोरोनाच्या टाळेबंदीत वाया गेलेली अडीच वर्षे आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. त्यात सर्वाधिक विश्वासार्ह असलेल्या ‘एमपीएससी’चाही कारभार विस्कळीत झाला असून, घोषित होणारी प्रत्येक परीक्षा रखडत आहेत. त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असलेले विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत.
धाराशिवहून पुण्यात अभ्यासाला आलेला सुधीर (नाव बदललेले) सांगतो, ‘राज्य सेवेच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अजूनही घोषित झालेली नाही. मागील अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबीत आहे. दर महिन्याला मला सात ते १० हजार रुपये खर्च येत असून, पुण्यात राहावे का नाही? हाच मोठा प्रश्न आहे.
‘एमपीएससी’ला घटनात्मक स्वायत्तता असतानाही ते विद्यार्थी हिताचे काम का करत नाही, असाही प्रश्न काही उमेदवारांनी उपस्थित केला. दरम्यान, याबाबत ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रलंबित प्रश्न
पसंती क्रमांकाबाबत चुकीची प्रक्रिया
कर सहाय्यक पदाचा लावलेला चुकीचा निकाल
‘पीएसआय’पदी अपात्र खेळाडूंची निवड
गट ‘क’ लिपिक पदाचा निकाल आणि कौशल्य चाचणी रखडली
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ची सुधारित तारीख कधी घोषित होणार?
संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ व गट ‘क’ची जाहिरात
‘पीएसआय’ (२०२२) मैदानी चाचणीची तारीख
खात्यांतर्गत ‘पीएसआय’ पदाचा निकाल
ऑप्टिंग आऊटचे सुधारित धोरण
वेळापत्रकाची अंमलबजावणी न होणे
निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत
रखडलेल्या मुलाखतींची माहिती नाही
प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून, उमेदवारांचे नुकसान होत आहे
रखडलेल्या परीक्षांबाबत अजून कोणतीही घोषणा नाही
काही पदांचे एक ते दोन वर्षांपासून अभ्यासक्रम घोषित नाही
‘पीएसआय २०२१’चा अंतिम निकाल लावला जात नाही
प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत चुकीची माहिती
कृषी सेवा राजपत्रित २०२२ अंतिम निकाल सहा महिन्यांपासून प्रलंबित
पोलिस उपनिरीक्षक २०२० आणि २०२१चा निकाल घोषित झाला आहे. मात्र, ‘पीएसआय’ २०२२ आणि २३ची भरती रखडली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाला जमते, ते ‘एमपीएससी’ला का जमत नाही? प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचे का?
- सुनीता (बदलेले नाव)