Pune News पुणे : पुणे महापालिकेतील (PMC) उपायुक्तपदाच्या पाच जागा रिक्त आहेत. याशिवाय अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन पैकी दोन जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण सात उच्च पदांवरील जागा रिक्त आहेत.
राज्य शासनाकडून तेथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अर्थात आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने महापालिका प्रशासनावर ताण पडून एकूण कामकाजावर परिणाम होत आहे.
अतिरिक्त आयुक्त (विशेष) या पदावर विकास ढाकणे कार्यरत होते. त्यांची लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बदली करण्यात आली. ती जागा गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. समाज विकास, भूसंपादन, पथ, विधी यासह अनेक महत्त्वाची खाती या पदावरील अधिकाऱ्याकडे होती, ही जागा रिक्त असल्याने अतिरिक्त कार्यभार खुद्द आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडेच आहे.
अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे यांची नुकतीच कृषी आयुक्तपदी बदली झाली. या पदासाठी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असून त्यात महिलांचाही समावेश आहे, पण बिनवडे यांची बदली होऊन चार दिवस उलटून गेले तरीही नियुक्तीचा आदेश निघालेला नाही. सध्या अतिरिक्त आयुक्त या पदावर पृथ्वीराज बी. पी. हे एकमेव अधिकारी कार्यरत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या पाच उपायुक्तांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले नसल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पाच जणांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. निर्णयप्रक्रिया मंदावली असल्याने नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतिक्षा आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिनवडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यांकडे द्यायची याचा निर्णय आयुक्त त्यांच्या अधिकारात घेतात, पण या वेळी राज्य शासनाकडून बिनवडे यांच्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात यावा, असा आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांनी स्वतंत्रपणे काढला. त्याचीही प्रशासनात चर्चा रंगली आहे.