पुणे (Pune) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या होळकरवाडी (ता. हवेली) येथील दोन नगर रचना योजना (TP Scheme) मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर केल्या आहेत. यातील एक योजना १५८.१९ हेक्टरवर तर दुसरी योजना १३०.७८ हेक्टरवर होणार आहे. या दोन्ही योजनेतून पीएमआरडीएने हाती घेतलेल्या प्रस्तावित रिंगरोडसाठी (Ring Road) १९.६१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध होणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. टीपी स्कीमच्या माध्यमातून रिंगरोडसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच या परिसराचा नियोजनबध्द विकास होण्यास मदत होणार आहे.
होळकरवाडी येथील दोन्ही टीपी स्कीम बाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यासाठी शासनाने लवाद म्हणून सेवा निवृत्त सहाय्यक संचालक मारुती राठोड यांची नियुक्ती केली होती. लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर करण्यात आली आहे.
होळकरवाडी येथील दोन्ही टीपी स्कीममध्ये एकूण २८१.५० हेक्टर क्षेत्राचा तर ८.५२ हेक्टर नाल्याचा समावेश आहे. तसेच २ हजार ६०० खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये ५० टक्के क्षेत्राचे म्हणजेच १४२.७५ हेक्टरचे ३२० विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृह योजनांसाठी ३७.१७ हेक्टर क्षेत्राचे २७ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.
या टीपी स्कीममध्ये १९.६१ हेक्टर क्षेत्र रिंगरोडसाठी तर ३१.१९ हेक्टर क्षेत्र अंतर्गत रस्ते यासाठी उपलब्ध होणार आहे. याचसह मैदानांसाठी ५.५० हेक्टर, बगीचासाठी १९ हेक्टर, बालोउद्यानासाठी ३.९३ हेक्टर, ग्रीन बेल्टसाठी १३.६२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
याशिवाय नागरी सुविधांमध्ये दोन प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, घनकचरा संकलन केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, तीन भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, दोन सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया आदींसाठी १४.११ हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. तसेच या योजनेतून प्राधिकरणास १७.०४ हेक्टर क्षेत्राचे २५ भूखंड उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.