पुणे (Pune) : डिझेल (Diesel), सीएनजी (CNG) व इलेक्ट्रिकनंतर (Electric) आता ‘पीएमपी’ (PMP) प्रशासन बस चालविण्यासाठी नव्या इंधनाचा विचार करीत आहे. ‘हायड्रोजन’ मिश्रित ‘हायड्रो-सीएनजी’वर बस चालविण्यासाठी ‘पीएमपी’ने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाशी (ARAI) चर्चा सुरू केली आहे.
लवकरच या संदर्भात ‘एआरएआय’कडून ‘पीएमपी’ला प्रस्ताव सादर होणार आहे. त्यानंतर सर्व स्तरांवर याची चर्चा करून संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ‘हायड्रो-सीएनजी’चा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यास मान्यता मिळाली तर ‘पीएमपी’च्या बस ‘हायड्रो-सीएनजी’वर धावताना दिसतील.
पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. ‘हायड्रोजन’ हे इंधन तुलनेने स्वस्त आहे. शिवाय ते मुबलक प्रमाणात देखील आहे. त्यामुळे चारचाकीसह रेल्वे देखील ‘हायड्रोजन’वर धावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुण्यातील ‘एआरएआय’ संस्थेने ‘हायड्रो-सीएनजी’वर संशोधन केले असून, ते यशस्वी ठरले आहे. ‘सीएनजी’मध्ये १७ टक्के हायड्रोजन मिसळल्यास इंजिनच्या रचनेत कोणताही बदल न करता बस चांगल्या पद्धतीने धावू शकते.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतरच ‘एआरएआय’ने ‘पीएमपी’शी संपर्क साधला आहे. सध्या हा विषय चर्चेच्या स्तरावर आहे. मात्र येत्या काही दिवसांत ‘पीएमपी’ यावर मोठा निर्णय घेऊ शकते. या संदर्भात नुकतेच ‘पीएमपी’चे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व ‘एआरएआय’चे संचालक यांच्यात बैठक झाली आहे. प्रस्ताव सादर झाल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
‘हायड्रोजन’वर बस धावल्यास
- ‘सीएनजी’त १७ टक्के ‘हायड्रोजन’चे मिश्रण केल्याने ‘सीएनजी’चा वापर कमी होईल
- ‘सीएनजी’ इंधनात बचत
- बसला सध्याच्या तुलनेत चांगला ‘ॲव्हरेज’
- बसची वहन क्षमता वाढेल
हायड्रो-सीएनजीबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. ‘एआरएआय’कडून प्रस्ताव आल्यावर तो संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- डॉ. संजय कोलते (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे)