चाकण (Chakan) : पुणे-नाशिक फाटा ते चांडोली हा एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी कन्सल्टन्ट नियुक्त करण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पार पडली आहे. येत्या काही दिवसांत टेंडर उघडल्यानंतर कन्सल्टन्ट नियुक्त करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
चाकण चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एलिव्हेटेड रस्त्याच्या प्रकल्पाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार कन्सल्टंन्ट नियुक्तीसाठी टेंडर भरण्याची शेवटची मुदत संपली असून, येत्या काही दिवसांत टेंडर उघडल्यानंतर कन्सल्टंट नियुक्त करण्यात येईल, असे चर्चेदरम्यान कदम यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकण चौकातील रस्त्याच्या चारही बाजूला ताब्यात असलेल्या कच्च्या रस्त्याचे ५०-५० मीटर डांबरीकरण करून रस्ता रुंद करण्याची खासदार डॉ. कोल्हे यांची मागणी मान्य करत प्रकल्प संचालक कदम यांनी तत्काळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे हे डांबरीकरण झाल्यानंतर चौकात होणारे अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगला आळा बसून वाहनांसाठी जास्त रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे.
रम्ब्लर स्ट्रीप्स मारण्याचे आदेश
या चर्चेदरम्यान राजगुरुनगर ते सिन्नर (पुणे हद्द) रस्त्यावरील कळंब ते नारायणगाव ४२ मैल येथील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जैदवाडी जंक्शन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील बनकर फाट्यासह विविध ठिकाणी सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना तातडीने पुरेशा जाडीच्या रम्ब्लर स्ट्रीप्स मारण्याचे आदेश प्रकल्प संचालक कदम यांनी दिले.