पुणे (Pune) : खेड तालुक्यातील ज्या गावातून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune - Nashik Semi Highspeed Railway) मार्ग जात आहे. आदेशानुसार गावातील रेल्वे प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजण्या महारेलने तात्पुरत्या पुढे ढकलल्या आहेत. आदेशानुसार काही परवानग्या मिळाल्या नाहीत, अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी नुकतीच दिली.
चाकण (ता.खेड) परिसरातील बाधित जमिनीच्या मोजण्या एक महिना पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये कडाचीवाडी, रासे व इतर गावांच्या मोजण्या करण्यात येणार आहेत. चाकणची कडाचीवाडी येथे रेल्वे जंक्शन होणार आहे. संरक्षण विभागाने हरकती घेतल्यानंतर काही गावातील जमिनीचे गट बदलले आहेत. खेड तालुक्यातील २१ गावांमधून रेल्वे मार्ग जातो आहे. यातून केळगाव वगळले आहे.
दरम्यान, पुणे -नाशिक अंतर अगदी अडीच तासात कापले जाणार असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.त्यामुळे हा रेल्वेमार्ग लवकर व्हावा अशीही प्रवाशांची मागणी आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा पुणे, नगर, नाशिक जिल्हा या ट्रँगल परिसराच्या विकासाला मोठी चालना देणारा आहे. हा रेल्वे मार्ग कधी सुरू होणार याकडे नागरिक, उद्योजक सर्वांचे लक्ष आहे. पुणे-नाशिक रस्ते मार्गाने नाशिक व पुणे अंतर पार करण्यास पाच तासापेक्षा अधिक काळ लागतो. त्यामुळे पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग लवकर झाला तर तो कालावधी कमी लागणार आहे. त्यामुळे कंपनी मालाची वाहतूक, प्रवाशांची वाहतूक, शेती माल वाहतूक याला चालना मिळणार आहे.
नाशिक, चाकण, नगरचा कांदा थेट पुणे बाजारात येण्यासाठी सध्या ट्रक वाहतुकीने अधिक खर्च येतो आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी नाशिक, नगरचा कांदा पुण्यात वाहतूक खर्च वाढत असल्याने आणत नाहीत. चाकणचा कांदा ही नाशिक बाजारात वाहतूक खर्च वाढत असल्याने नेला जात नाही. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग झाल्यानंतर शेतीमालाची वाहतूक पुणे, नाशिक, नगर या शहरात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत सध्या नाशिक, नगर जिल्ह्यात भूसंपादन सुरू आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर भूसंपादन जोरात सुरू आहे. नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ही भूसंपादन सुरू आहे. परंतु भूसंपादनाची प्रक्रिया महारेलने स्थगित केलेली नाही.
- विनीत टोके, अधिकारी, महारेल