पिंपरी (Pimpri) : मुंबई, पुणे आणि नाशिक ही त्रिकोणात जोडली गेलेली महानगरे. द्रुतगती व महामार्गामुळे मुंबई व पुणे काही मिनिटांच्या अंतरावर आली आहेत. पण, पुणे आणि नाशिक साधारण सव्वादोनशे किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी साडेपाच तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.
हे अंतर आणखी कमी करणे, वेळ कमी लागणे आणि मार्गावरील नित्याची कोंडी दूर करण्यासाठी नवीन पर्यायी मार्ग प्रस्तावित आहे. तो उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या तळवडे व चिखलीलगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार आहे. यामुळे दोन्ही शहरांतील अंतर साधारण पन्नास किलोमीटरने कमी होणार असून, त्याचे नियोजित स्वरूप ‘द्रुतगती’ मार्ग असल्याने वाहनांचा वेग वाढून प्रवासातील अंतरही कमी होणार आहे.
शिवाय, सध्याच्या महामार्गावर नाशिक फाटा (कासारवाडी) ते चाकणपर्यंत एलिव्हेटेड मार्ग आणि पुणे-नाशिक हायस्पिड लोहमार्गही प्रस्तावित आहे. या तीनही मार्गांचा सर्वाधिक फायदा उद्योगनगरीला होणार आहे.
जुना पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चाकणपर्यंत सहापदरी रुंदीकरण प्रस्तावित आहे. शिवाय, तो एलिव्हेटेड (उन्नत) करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यासह नवीन विचाराधीन मार्गाचा सर्वाधिक फायदा उद्योगनगरीलाच होणार आहे. नवीन मार्ग प्रस्तावित असलेले म्हाळुंगे गाव इंद्रायणी नदीच्या उत्तरेला आहे. तर, नदीच्या दक्षिणेला तळवडे व चिखली ही पिंपरी-चिंचवड शहराची उपनगरे आहेत.
तळवडे व म्हाळुंगे जोडण्यासाठी पूल बांधला आहे. चाकण, आंबेठाण, म्हाळुंगे, निघोजे आदी भागातील औद्योगिक पट्ट्यातील सर्व वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. रस्ताही चांगला आहे. शिवाय, चिखली व मोई जोडणाऱ्या पुलामुळेही नवीन रस्ता ‘कनेक्ट’ होणार आहे. शहराच्या सध्याच्या विकासाला हा रस्ता पूरक ठरणारा आहे. तसेच, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीआमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडला नवीन रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे तळवडे, चिखली, मोशीसह डुडुळगाव, चऱ्होली ही उपनगरेही रिंगरोडच्या व देहू-आळंदी रस्त्याच्या माध्यमातून नव्या रस्त्याला जोडली जाणार आहेत.
असा असेल नवीन मार्ग
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे- म्हाळुंगे- आंबेठाण- कोरेगाव- किवळे- कडूस- चास- घोडेगाव- जुन्नर- अकोले- संगमनेर- सिन्नर- नाशिक
जोडले जाणारे भाग
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक तालुके
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी म्हाळुंगे ते संगमनेर असा पर्यायी मार्ग सरकारला सुचवला आहे. सध्याच्या नाशिक महामार्गाला चांगला व कमी अंतराचा पर्यायी रस्ता होऊ शकतो. सद्यःस्थितीत रस्ता तयार असून, केवळ रुंदीकरणाची गरज आहे. दोन छोटे घाट आहेत. ते फार अवघड नाहीत. अंतर्गत भागाच्या विकासाला चालना मिळेल.
- दिलीप मोहिते-पाटील, आमदार, खेड-आळंदी
नवीन मार्गाबाबत अधिकृतपणे माहिती नाही. पण, त्याबाबत कानावर आले होते. त्याआधी सरकारने सध्याच्या महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकणपर्यंतच्या एलिव्हेटेड मार्ग करावा. या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली आहे. पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे. त्यावर केवळ एका मंत्र्यांची सही बाकी आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ