पुणे (Pune) : G-20 परिषदेच्या दुसऱ्या बैठकीनिमित्त शहरातील सुशोभीकरणाच्या कामात कुंड्या, झाडांच्या खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण यापूर्वीच उघडकीस आले आहे. त्यानंतर आता विद्युतरोषणाईच्या कामातही अनियमितता आढळून आली.
अधिकाऱ्यांनी ठराविक ठेकेदारांना (Contractors) काम मिळावे म्हणून टेंडर (Tender) प्रक्रियेच्या नियमावलीचे उल्लंघन केले. टेंडर उघडण्यापूर्वीच ठेकेदारांकडून कामे करून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शहरातील विविध रस्ते, चौक विद्युतरोषणाईने उजळून टाकण्याची जबाबदारी विद्युत विभागावर सोपविण्यात आली होती. शनिवारी ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत मेट्रो पिलरवर रंगीत प्रकाशझोत सोडण्यासाठीची टेंडर काढण्यात आले आहे. सुमारे ४० लाख रुपयांचे हे टेंडर आहे. सात दिवसांच्या अल्प कालावधीसाठीची टेंडरची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच रविवारी रात्री विद्युतरोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले.
नळस्टॉपसह वेगवेगळ्या भागांतील उड्डाणपूल, विश्रांतवाडी येथील रस्ता, टिळक चौक ते दांडेकर पूल येथील कामांच्या टेंडर काढण्यात आले. टेंडर उघडण्यापूर्वीच ठराविक ठेकेदारांकडून कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावण्यात आला. टेंडर प्रक्रियेचा केवळ बनाव केल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी उद्यान विभागाने नगर रस्ता परिसरात कुंड्या, विदेशी प्रजातींची झाडे खरेदीसाठी दोन स्वतंत्र टेंडर काढल्या होत्या. हा प्रस्ताव एस्टिमेट कमिटीसमोर जाऊ नये म्हणून टेंडर तुकड्यांमध्ये काढण्यात आल्या होत्या.
जी २० परिषदेनिमित्त शहरात विद्युतरोषणाई करण्यात आली. हे काम युद्धपातळीवर करायचे होते. त्यामुळे कामाला प्राधान्य देण्यात आले. नियमांचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन करण्यात आलेले नाही.
- श्रीनिवास कंदुल, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका