पुणे (Pune) : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत असताना विसर्जनासाठी पुणे शहरात (Pune City) विविध ठिकाणी विसर्जन हौद, टाक्या उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे असताना पुन्हा एकदा फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करून एक कोटी ३५ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. नागरिकांची मागणी नसतानाही व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही काही जणांसाठी ही टेंडर (Tender) प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ हौद बांधले आहेत. ३५९ लोखंडी टाक्यांमध्ये शहरात विविध ठिकाणी विसर्जन केले जाते. १९१ मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था असणार आहे. तसेच अनेक नागरिक वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी आग्रही असतात त्यामुळे नदी आणि कॅनॉलमध्ये मूर्ती विसर्जन होते. कोरोनाच्या पूर्वी ही यंत्रणा अस्तित्वात होती. पण कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पाडण्यावर निर्बंध असल्याने विसर्जनासाठी फिरत्या हौदाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२० मध्ये ३० फिरते हौद होते, तर २०२१ मध्ये ६० फिरत्या हौदाची व्यवस्था केली. पण त्यातही मोठ्याप्रमाणात गोंधळ झाला. विसर्जन रथ जागेवरच असताना ते शहरात फिरत असल्याचे सांगण्याचा प्रकार उजेडात आला होता. यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काय आहे नेमका प्रकार
- यंदाच्या वर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जन
- त्यासाठी ४६ हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन केंद्रे अशी व्यवस्था
- वाहत्या पाण्यातही विसर्जन केले जाणार
- असे असतानाही तब्बल १५० फिरते विसर्जन हौद भाड्याने घेण्याचा घाट
- त्यासाठी एक कोटी ३५ लाख रुपये खर्च
- त्याची टेंडर प्रक्रिया दोन दिवसात सुरू होणार
- कोरोनाच्या काळात केवळ ६० हौद असताना आता १५० हौद कशासाठी हा प्रश्न
गणेश विसर्जनासाठी फिरत्या हौदाची गरज नाही, तरीही १५० हौदांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे टेंडर काढले जाणार आहे. त्यासाठी निधी वर्गीकरण केला आहे. कोणाचीही मागणी नसताना आयुक्त या हौदांसाठी का आग्रही आहेत, याचे उत्तर महापालिकेचे इतर अधिकारीही देऊ शकत नाहीत. हा निर्णय शहराच्या हिताचा नाही, त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया रद्द करावी.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे