पुणे (Pune) : शहरातील उड्डाणपूल, नदीवरील पूल सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेत तीन पैकी केवळ एकच ठेकेदार पात्र ठरला. त्यामुळे रिटेंडर काढले आहे. दरम्यान, या प्रक्रियेमुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि अहवालानुसार सुधारणा करण्यासाठी पावसाळा संपल्यानंतरच सुरुवात होणार आहे.
महापालिकेचे शहरात उड्डाणपूल, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल असे एकूण ५९ पूल आहेत. २०१२-१३ पासून स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे, आत्तापर्यंत ३१ पुलांचे ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती केली आहे. पण, हडपसर येते एमएसआरडीसीकडून बांधलेल्या पुलाला केवळ १५ वर्षातच तडे गेल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यासाठी हा पूल बंद ठेवून दुरुस्ती केली होती. यापार्श्वभूमीवर महापालिकेने दहा वर्षापेक्षा जास्त जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. सध्या शहरात ५० पैकी ४४ पूल हे दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वापरात आहेत. त्यामध्ये २८ नदीवरील पूल आणि १६ रेल्वेचे व रस्त्यावरील उड्डाणपूल आहेत.
त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठीची टेंडर प्रक्रिया राबवली. त्यामध्ये तीन कंपन्यांचे अर्ज आले, पण दोन कंपन्या अपात्र ठरली व एक कंपनी पात्र ठरली आहे. आता पालिकेकडून रिटेंडर मागविणार आहे. त्यामुळे रिटेंडरनंतर देखील स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या किती तज्ज्ञ संस्था पुढे येणार आणि त्या आल्यानंतर त्यांच्यातून योग्य ती संस्था निवडणे, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वर्कऑर्डर देणे व नंतर प्रत्येक्षात कामाला सुरुवात ही लांबलचक प्रक्रिया पावसाळा सुरू असताना होणार आहे.
कामासाठी एक कोटी खर्च अपेक्षित
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी ही कामे पावसाळा संपताना सप्टेंबर होण्याची शक्यता आहे. या कामासाठी एक कोटी ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यास पालिकेच्या वित्तीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.