पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी खड्ड्यांबाबत सतत माहिती मागूनही

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेच्या मुख्य पथ विभागाने दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पीरिएड - डीएलपी) रस्त्यांची माहिती जाहीर केली. पण सुमार दर्जाच्या कामामुळे सर्वाधिक खड्डे क्षेत्रीय कार्यालयांच्या ताब्यात असलेल्या १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या तब्बल ७७० रस्त्यांना पडले आहे. त्यामुळे ‘डीएलपी’तील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले. वारंवार सूचना देऊनही माहिती दडवली जात असून, अद्याप १५ पैकी एकाही क्षेत्रीय कार्यालयाने माहिती सादर केली नाही.

Pune
पुणे महापालिकेचा सुपर निर्णय; आता ठेकेदारांना एका खड्ड्याला ५ हजार

महापालिकेत १२ मीटरच्या वरच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, नवे रस्ते करणे हे काम मुख्य पथ विभागाकडे आहे. तर १२ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. या कामावर क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त व संबंधित परिमंडळाचे उपायुक्त यांचे थेट नियंत्रण असते. पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रचंड खड्डे पडले. मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांची स्थिती सारखीच होती. अनेक रस्त्यांचे काम अवघ्या काही महिन्यांपूर्वी होऊनदेखील पहिल्याच पावसात रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची माहिती मागवली असता केवळ १३९ रस्त्यांची माहिती समोर आली, त्यावेळी क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या रस्त्यांची माहिती त्यांच्याकडूनच स्वतंत्रपणे घ्यावी लागणार हे लक्षात आले.

Pune
पुणे महापालिकेने काढलेल्या टेंडरवरच ठेकेदारांकडून आक्षेप

क्षेत्रीय कार्यालयांनी ‘डीएलपी’मधील रस्त्यांची माहिती सादर करावी असे आदेश पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. पण आठवडा उलटून गेला तरी एकाही कार्यालयाने माहिती दिलेली नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनीच माहिती सादर करण्याचा लेखी आदेश दिला. शिवाय माहिती देण्यास टाळाटाळ करणे योग्य नाही असेही या पत्रात म्हटले आहे. तरीही अजूनही एकाही कार्यालयाने माहिती दिली नाही.

चारशे किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते
शहरात एकूण १३९८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी ४०० किलोमीटरचे रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे आहेत. यातील २०० किलोमीटरचे रस्ते मुख्य खात्याकडे व २०० किलोमीटरचे रस्ते क्षेत्रीय कार्यालयांकडे आहेत.

क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील ‘डीएलपी’मधील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती सादर होताच, त्यांची त्रयस्थ संस्थेकडून पाहणी करून सदोष काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

रस्त्यांचे प्रकार व एकूण लांबी

१२ मीटर पेक्षा कमी रुंदीचे रस्ते - ९७०.८६ किलोमीटर
१२ ते २४ मीटर - ३१४ किलोमीटर
२४ ते ३० मीटर - ६०.५४ किलोमीटर
३० ते ३६ मीटर - २९.९६ किलोमीटर
३६ ते ६१ किलोमीटर - २३.३९ किलोमीटर
एकूण लांबी - १३९८.६५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com