पुणे (Pune) : एकीकडे पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी वाहून जावे यासाठी नाले सफाईवर कोट्यवधी रुपये महापालिकेने खर्च केलेले आहेत. तर दुसरीकडे कायम वाहतूक कोंडीत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संतोष हॉल चौकात नाल्यावरील पूल (बॉक्स कलव्हर्ट) बांधण्याचे काम सुरू झाले केले आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने हे काम करणे सोईचे जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे असले तरी पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाहून कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune Municipal Corporation)
अधिकाऱ्यांची खासगीत कबुली
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधला जाणार आहे. सध्या पिलर उभारण्याचे काम केले जात असून, बॅरिगेटींग करून रस्त्याच्या मध्यभागी काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांनी महापालिकेला कलव्हर्टचे काम करण्याची परवागनी दिली आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे जुने कलव्हर्ट तोडून नव्याने बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या नाल्यातील मैलापाणी वाहून जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे. पण पावसाळ्यात संततधार पाऊस पडल्यानंतर नाल्याला येणाऱ्या पुराचे पाणी वाहून कसे जाणार, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगीमध्ये खूप पाऊस झाला तर डोकेदुखी वाढणार असल्याची कबुली दिली.
नाला तुंबण्याची शक्यता
सिंहगड रस्त्यावर ३६ मीटर लांब आणि ६ मीटर रुंदीचे बॉक्स कलव्हर्ट बांधले जाणार आहे. पूर्वीचे कलव्हर्ट तोडून नव्या कलव्हर्टच्या एका बाजूच्या भिंतीच्या सेंट्रींगचे काम सुरू आहे. या ठिकाणी ६ मीटर रुंदीचे दोन बॉक्स कलव्हर्ट असणार आहेत. कलव्हर्टची रुंदी जास्त असली तरी प्रत्यक्षात नाला हा साडेतीन ते चार मीटर इतका रुंद आहे. त्यामुळे नवे कलव्हर्ट बांधले तरी नाल्यातील अतिक्रमणांमुळे नाला तुंबण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
काय आहे स्थिती?
- तीन वर्षापूर्वी पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर येऊन नाल्यावरील काही पूल वाहून गेले
- महापालिकेकडून या नाल्यावरील पूल बांधणे, सुधारणा करणे यासाठी सुमारे ३६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
- अरण्येश्वर, पर्वती येथील काम पूर्ण
- दांडेकर पूल व इतर ठिकाणच्या नाल्यावरील कलव्हर्टचे काम सुरू आहे.
- तीन वर्षे सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल चौकाच्या जवळ पाटील हॉस्पिटल येथे नाल्याच्या कलव्हर्टचे काम वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने सुरू होऊ शकले नव्हते
- नऱ्हे, आंबेगाव, वडगावपासून येणाऱ्या या नाल्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणे
- नाला वेडावाकडा वळविण्यात आला
- अचानक मोठा पाऊस झाल्यानंतर या नाल्याची पाणी पातळी वाढून नाल्यातील पाणी थेट सिंहगड रस्त्यावर येते
उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पोलिसांनी याठिकाणी कलव्हर्ट बांधण्याच्या कामास परवानगी दिली असल्याने काम सुरू केले आहे. पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याची पातळी वाढल्यावर त्याचा नागरिकांना फटका बसणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हे काम तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या मध्यभागी काम सुरू आहे. यासाठी सुमारे दोन कोटीचा खर्च येणार आहे.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग