पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कर्वेनगरला जोडणारा ३९ कोटी रुपये खर्चून मुठा नदीवर नवा पूल बांधण्यात येणार होता. मात्र, ज्या कंपनीला हे काम दिले होते, ती आर्थिक अडचणीत आली आहे. शिवाय त्यांनी सुरक्षा ठेव न भरल्याने या पुलाचे टेंडर रद्द झाले आहे. आता नवा ठेकेदार नियुक्त करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांसाठी कॅनॉलच्या बाजूने पर्यायी रस्ता केला असला, तरी त्याचा वापर कमी होतो. कोथरूड, कर्वेनगर या भागात जाण्यासाठी वारजे आणि राजाराम पूल हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्याने कर्वेनगरचा भाग सिंहगड रस्त्याशी जोडण्यासाठी सनसिटीतून कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्स येथे नवा पूल प्रस्तावित करण्यात आला. या पुलासाठी सात कोटी ४३ लाख रुपये रोख मोबदला देऊन भूसंपादन पूर्ण केले आहे. ३० मीटर रुंद आणि ३४५ मीटर लांब असा हा पूल असणार आहे. हे काम २०२४-२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत आहे. या कामाचे कार्यआदेश दिले होते. त्यानंतर ठेकेदार कंपनीने १५ दिवसांत सुरक्षा ठेव भरून काम सुरू करणे अपेक्षीत होते. परंतु, दोन महिने उलटूनही कंपनीने काहीच प्रतिसाद दिला नाही. नोटिशीला उत्तरही दिले नाही. त्यामुळे महापालिकेने विधी विभागाचा अभिप्राय घेऊन टेंडर रद्द केले आहे.
एप्रिल महिना उजाडणार
महापालिकेने जुन्या ठेकेदाराला पुलाचे काम करण्यासाठी टेंडर रद्द केले आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन, त्यास स्थायी समितीची मान्यता घेऊन कामाचे आदेश दिले जातील. मात्र, यासाठी एप्रिल महिना उजाडणार आहे. हे काम २०२५ मध्ये पूर्ण होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘सनसिटी-कर्वेनगर पुलासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. त्याने सुरक्षा ठेव भरावी यासाठी आम्ही नोटीस बजावली; पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विधी विभागाचा अभिप्राय घेऊन टेंडर रद्द केले आहे. नव्याने टेंडर मागविले असून, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून काम सुरू केले जाईल.’’
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका