पुणे (Pune) : महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय अद्याप रखडलेले असताना आता निवडणुकीच्या तोंडावर वारजे येथे ३५० कोटींचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, तर बालेवाडीत ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने खासगी संस्थांमार्फत हे दोन रुग्णालये ‘डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर’ (डीबीएफओटी) तत्त्वावर उभारण्यात येणार असून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
वारजे येथे प्रभाग क्रमांक ३० मध्ये विकास आराखड्यात मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी ‘आर सेव्हन’ अंतर्गत जागा आरक्षित आहे. या ठिकाणी १० हजार ५६४ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णालय उभारणे व त्यासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे ‘डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर’ (डीबीएफओटी) तत्त्वावर हे रुग्णालय उभे करून संबंधित संस्थेला ते ३० वर्ष चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यामध्ये काही बेड सीजीएचएस दराने, काही मोफत व काही बेड खासगी दराने उपलब्ध करून दिल्यास हा प्रकल्प ‘डीबीएफओटी’ तत्त्वावर उभारणे शक्य आहे. त्यातून सीजीएचएस बेडही उपलब्ध होतील आणि महापालिकेला उत्पन्नही मिळेल. या रुग्णालयासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री पुरविण्याची जबाबदारी निविदा धारकाची असणार आहे. प्रकल्पासाठी निविदाधारक कर्ज घेऊ शकतो. या कर्जाची परतफेड करण्याची हमी महापालिका संबंधित संस्थेला देणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
कर्करोगाचे उपचार महाग असल्याने महापालिकेतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभे केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल. परंतु महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने ‘प्लॅन, डिझाइन, बिल्ट, इक्विप, फायनान्स’ (पीडीबीआईएफ) या तत्त्वावर खासगी संस्थेमार्फत या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्था कर्ज घेऊ शकते. त्याची परतफेड करण्याची करण्याची हमी महापालिका देणार आहे. त्यासाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे.
सरकारने मान्यता दिल्यास या दोन्ही रुग्णालयांसाठी टेंडर काढले जाणार आहे. कर्करोग रुग्णालयासाठी बालेवाडी येथे सुमारे १० हजार चौरस फुटाची जागा असून, त्या ठिकाणी ३ लाख ७७ हजार चौरस फुटाचे बांधकाम करणे शक्य आहे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
प्रस्तावासाठी सभेची तहकुबी लांबवली
वारजे आणि बालेवाडी येथील रुग्णालयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. त्यास स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. समितीची बैठक आज कामकाज न करता तहकूब केली जाणार होती. पण रुग्णालयाचा प्रस्ताव सादर होणार असल्याने सभेची तहकुबी सुमारे एक तास लांबणीवर टाकण्यात आली.
असा आहे प्रस्ताव
- वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
- बालेवाडी येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय
- ‘डीबीएफओटी’ तत्त्वावर होणार रुग्णालयांची उभारणी
- प्रकल्पासाठी संबंधित संस्थांना कर्जाच्या परतफेडीची हमी