पुणे (Pune) : जुन्या हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी १४०० किलोमीटरचे आणि त्यावर पावसाळी गटार केवळ २६८ किलोमीटर लांबीच्या आहेत. समाविष्ट ३४ गावांमध्ये तर पावसाळी गटारांचा पत्ताच नाही अशी स्थिती आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अपुरी व्यवस्था असताना दुसरीकडे त्यांची व्यवस्थित साफसफाई न करणे, ओएफसी केबल टाकून गटार बंद करणे यामुळे पुणे तुंबत आहे. महापालिका प्रशासनाने या केबल तोडल्यानंतर आता या कंपन्यांकडून पुन्हा बिनधास्तपणे केबल टाकल्या जात आहेत.
टिळक चौक, डेक्कन जिमखाना परिसर, नळ स्टॉप, कर्वे पुतळा, गुंजन टॉकीज, जेधे चौक स्वारगेट, स. प. महाविद्यालय चौक, फिनिक्स मॉल विमाननगर, कोथरूड कचरा डेपो, गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, सिंहगड रस्ता, पानमळा, पु. ल. देशपांडे उद्यान, माणिकबाग, शेलारमामा चौक घोले रस्ता, दीप बंगला चौक, राजाराम पूल, महेश सोसायटी चौक, निलायम टॉकीज चौक, सोपानबाग वानवडी, भारत फोर्ज, लुल्लानगर, टिंबर मार्केट, लोहिया नगर यासह हडपसर, कोंढवा, मुंढवा भागात अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. या भागातील २६८ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची, चेंबरची स्वच्छता करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. संबंधित ठेकेदार एकदाच स्वच्छता करतात, त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. मलनिस्सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्यात समन्वय नसल्याने ही कामे व्यवस्थित होत नाहीत.
शहरात इंटरनेटसाठी ओएफसी केबल टाकण्यासाठी महापालिकेने कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. त्यासाठी त्यांना खोदाई शुल्क भरावे लागते. मात्र पावसाळी गटारांच्या पाइपमधून केबल टाकण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावर एकाच वेळी १० ते १५ केबल स्वतंत्रपणे टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे. अशा प्रकारे संपूर्ण शहरात ओएफसी केबल टाकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान महापालिकेने केबल तोडल्यानंतर अवघ्या काही वेळातच या केबल जोडण्यासाठी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले.
उतरा एका बाजूला चेंबर दुसरीकडेच
शहरात ५७ हजारपेक्षा जास्त पावसाळी गटारांचे चेंबर आहेत. त्यातून पाण्याचा निचरा होते. पण महापालिकेचे ठेकेदार, अभियंते चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने अनेक चेंबरमध्ये पावसाचे पाणी जातच नाही. चेंबरच्या झाकणाच्या उतार असणे अपेक्षीत असताना तेथे चढ असतो, त्यामुळे पावसाचे पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाते. तसेच रस्त्याच्या ज्या बाजूने उतार आहे तेथे पावसाळी गटार, चेंबर टाकता, चढाच्या दिशेने असल्याने पाणी रस्त्यावरच थांबते. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांच्या कौशल्यावरच प्रश्न उपस्थित होतो.
अन् प्रशासनाचे डोळे उघडले
शहरात काही माजी नगरसेवक हे डक्टमध्ये ओएफसी केबल टाकण्याचे काम कंपन्यांकडून घेऊन त्यातून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. त्यांचे राजकीय वजन वापरून रात्रीच्या वेळी पावसाळी गटारातून केबल टाकून घेतात. त्यामुळे कोणीही आत्तापर्यंत आक्षेप घेतलेला नाही. मात्र, आता शहर तुंबल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत.
इतके वर्ष दुर्लक्ष का?
शहरात ओएफसी केबल गेल्या काही वर्षांत टाकलेल्या आहेत. महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाते त्यावेळी या केबलची अडचणी होत असतानाही त्याकडे प्रशासनाने इतके वर्ष का दुर्लक्ष केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळीच या गोष्टींना मज्जाव केला असता, कंपन्यांना मोठा दंड ठोठावून, गुन्हे दाखल केले असते तर हे प्रकार थांबले असते.
कोणत्या भागात किती पावसाळी गटार (मीटरमध्ये) व चेंबर संख्या
- परिमंडळ एक (येरवडा, नगर रस्ता, ढोले पाटील) -६९,४७७ ------------११,५८६
- परिमंडळ दोन (शिवाजीनगर, औंध, कोथरूड) - ५१,३१० ----------१४,७३२
- परिमंडळ तीन (वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी) -४१,४९४ ----११,१४०
- परिमंडळ चार (वानवडी, हडपसर, कोंढवा) - ३८,४७३ ----------६,३७३
- परिमंडळ पाच (भवानीपेठ, कसबा, बिबवेवाडी) - ६७,३०९---------१३,७६९