पुणे (Pune) : शहरातील रस्ते यंत्राद्वारे झाडण्याचे टेंडर सुमारे नऊ ते ११ कोटी रुपयांपर्यंत जादा दराने आल्याने महापालिका प्रशासनाने बचतीसाठी टेंडर रद्द केले. त्याचप्रमाणे जैविक उत्खननाच्या टेंडरमध्ये अंदाजापेक्षा तब्बल १३ कोटी ५० लाख रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत टीपिंग शुल्क (वाहतूक खर्च) बरेच जास्त आहे. हा दर कमी न झाल्यास हे टेंडरही महापालिका रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील १० लाख टन कचऱ्याच्या जैविक उत्खननासाठी ‘बी पाकिट’ पद्धतीने टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये दोन ठेकेदार पात्र ठरले आहेत. त्यात भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीने सर्वात कमी ९७९ रुपये प्रति टन असा दर दिला. महापालिकेच्या ८४४ रुपये प्रति टन दरापेक्षा हा दर १३५ रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचे १३ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. हा दर कमी करावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कंपनीला पत्र दिले आहे. एकीकडे हे टेंडर जादा दराने आलेली असताना दुसरीकडे यंत्राद्वारे रस्ते झाडण्यासाठी तीन टेंडर काढण्यात आली. या प्रत्येक कामाचा पाच वर्षांचा खर्च २०.८० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. पण या तिन्ही टेंडरसाठी पात्र ठरलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल या कंपनीने एका टेंडरमध्ये ९.३५ कोटी, दुसऱ्या टेंडरमध्ये १०.८२ कोटी आणि तिसऱ्या टेंडरमध्ये ८.८ कोटी इतका जास्त खर्च दाखवला आहे. या टेंडरसाठी महापालिकेला जास्त पैसे रक्कम मोजावी लागणार असल्याने त्या रद्द करून फेरटेंडर राबविण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. त्याच प्रमाणे जैविक उत्खननाच्या कामात सांगली, लखनौ, नोएडा येथे टीपिंग शुल्क खूप कमी आहे. पुण्यात मात्र जादा दर आल्याने महापालिकेचे १३ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.
टेंडर रद्द करा’
याविषयी स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले की, ‘या टेंडरमध्ये महापालिकेचे नुकसान होणार असल्याचे आम्ही यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. जैविक उत्खननाचे टेंडर कमी दराने आली पाहिजे. त्यासाठी टेंडर रद्द करण्यात आली पाहिजे.’ दरम्यान, याबाबत घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.