पुणे (Pune) : धायरी गावात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मॅकडोनाल्ड ते सावित्री गार्डनपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात दाखविला आहे. या रस्त्याची आखणी अंतिम नसताना व जागाही ताब्यात नसताना पथ विभागाने दोन कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. जागा ताब्यात येईल, या भरवशावर हे टेंडर काढल्याचा खुलासा पथ विभागाने केला आहे. या रस्त्यावर यापूर्वी पावणेदोन कोटी रुपये खर्च केले असले तरी त्याचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही.
सिंहगड रस्त्यावरून धायरीकडे जाण्यासाठी सध्या एकच रस्ता आहे. वाढलेली लोकसंख्या, वाहनांची संख्या, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे या रस्त्याचा पूर्णपणे वापर करता येत नाही. तसेच अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. विकास आराखड्यात सिंहगड रस्त्यावर धायरी फाट्याचा उड्डाणपूल संपल्यानंतर मॅकडोनाल्ड ते सावित्री गार्डन हा दोन किलोमीटरचा रस्ता दाखविला आहे. या रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात नाही. तसेच रस्त्याची आखणी व्यवस्थित नसल्याने त्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महिन्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे जागा मालकांची बैठक झाली. त्यामध्ये सर्वांची समान जागा घ्यावी, गाव नकाशावरून रस्त्याची आखणी निश्चित करून त्यानंतर रस्ता करावा, अशी भूमिका जागा मालकांनी मांडली होती. त्यानंतर महिन्यात मोजणी करून रस्त्याची आखणी करण्याचे काम पूर्ण करावे, असा आदेश ढाकणे यांनी प्रशासनाला दिला होता. मात्र, गेल्या महिन्यात याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही.
दोन कोटी खर्चून रस्त्यावर झुडपे
हा रस्ता नेमका करणार कुठे? याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. काही जागा मालकांनी रस्त्याची जागा ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे निविदा काढल्याचे अधिकारी सांगत आहेत. यापूर्वीही ५० लाख रुपयांचे टेंडर काढून निधी खर्च केला. अशा प्रकारे तीन-चार वर्षांत पावणेदोन कोटी रुपये खर्च केले आहेत, पण या रस्त्यावर गवत आणि झुडपे वाढले आहेत. हे प्रशासनाला माहिती असूनही पुन्हा दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
मॅकडोनाल्ड ते सावित्री गार्डन या रस्त्याची मोजणी व आखणी झालेली नाही. पण काही जागा मालक जागा ताब्यात देण्यास तयार असल्याने त्या भरवशावर दोन कोटींचे टेंडर काढली आहे. यामध्ये २०० मीटर लांब, नऊ मीटर रुंदीचा रस्ता होऊ शकतो. गेल्यावर्षी ५० लाखांचा निधी उपलब्ध होता.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग