पुणे (Pune) : शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने ६० कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यापूर्वी शहरात पाच वर्ष याच पद्धतीने रस्ते स्वच्छ केले जात होते, पण कामाचा दर्जा नसल्याने स्वच्छतेऐवजी केवळ धूळ उडत असल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या टेंडरचा घाट घातलेला असताना कामाच्या दर्जावर नियंत्रण कसे ठेवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
महापालिकेतर्फे शहरातील रस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाडून घेतले जातात. पण २०१७ पासून पेठांचा भाग वगळता इतर चार परिमंडळातील प्रमुख नऊ रस्ते स्वीपरने स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षांपूर्वी काढलेल्या टेंडरची मुदत संपल्याने घनकचरा विभागाने परिमंडळ एक, तीन आणि चार मध्ये पुढील पाच वर्षांसाठी नवीन टेंडर काढले आहे. पहिल्या मुदतीत एकाच ठेकेदाराने टेंडर भरल्याने आता टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्वीपरद्वारे असे काम अपेक्षीत
- रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत मशिनने रस्त्यांची स्वच्छता
- स्वीपर मशिनमध्ये दोन हजार लिटर पाण्याची टाकी असते
- गाडीच्या खालच्या बाजूला गोल फिरणारे झाडू असतात
- दुभाजक आणि पादचारी मार्ग या दोन बाजूने ही गाडी जाताना पाण्याचा फवारा मारून झाडू फिरविणे अपेक्षीत
- धूळ न उडवता रस्ता स्वच्छ झाला पाहिजे
- पालापाचोळा, पाण्याच्या बाटल्या, खडी, वाळू, माती हा कचरा आतमध्ये ओढून घेतला जातो
अशी आहे सद्यःस्थिती
- प्रथम दुभाजकाच्या बाजूने गाडी फिरवली जाते. त्यानंतर पादचारी मार्गाच्या बाजूने गाडी फिरते असा प्रशासनाचा दावा
- व्यवस्थित पाणी न मारता वेगामध्ये गाडी चालवली जाते
- मोठ्या प्रमाणात धुळ उडते, रस्त्यावरील पालापाचोळा, माती, खडी पूर्णपणे उचलली जात नाही
- बराच कचरा दुभाजकाच्या व पादचारी मार्गाच्या बाजूला चिकटून राहतो
- शिल्लक राहिलेला कचरा काढण्यासाठी प्रयत्न केला जात नाही
- स्वीपरच्या कामादरम्यान महापालिकेचा कर्मचारी, अधिकारी उपस्थित नसतो
नवीन टेंडरमध्ये याचाही समावेश
परिमंडळ एक, तीन, चार साठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये दुभाजक जेटिंग मशिनने स्वच्छ करण्याच्या कामाचा समावेश केला आहे. पान, गुटखा खाऊन थुंकल्याने दुभाजक घाण झालेला असतो. मातीही त्यावर बसते, त्यामुळे दुभाजकाची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी जेटिंग मशिनचा वापर करावा तसेच प्रत्येक स्वीपर मशिनसोबत कचरा उचलण्यासाठी डंपर अनिवार्य केला आहे.
दररोज ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ
या निविदेत नऊ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येक रस्त्याची लांबी १० किलोमीटर आहे. स्वीपरने दुभाजकाच्या दोन्ही बाजूने व रस्त्याच्या दोन्ही बाजूचा पादचारी मार्ग असे चार वेळा म्हणजे एका रात्रीत एका स्वीपरने ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करणे आवश्यक आहे.
हे आहेत रस्ते (कंसात रक्कम)
परिमंडळ एक (२०.८० कोटी)
आळंदी रस्ता
नगर रस्ता-मुंढवा पूल, विमाननगर
गुंजन टॉकीज ते विमानतळ
परिमंडळ तीन (२०.८० कोटी)
सारसबाग ते नांदेड सिटी गेट
कात्रज चौक ते स्वारगेट
खंडुजीबाबा मंदिर ते वारजे पूल
परिमंडळ चार (२०.८० कोटी)
नोबेल हॉस्पिटल ते मगरपट्टा, पासपोर्ट ऑफिस
नोबेल हॉस्पिटल ते शेवाळवाडी
नोबेल हॉस्पिटल ते संविधान चौक, वानवडी
शहरातील नऊ रस्ते स्वीपर मशिनद्वारे झाडण्यासाठी पाच वर्षांचे टेंडर काढले आहे. त्यास एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिल्याने आणखी काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तीन परिमंडळांमध्ये हे काम होणार असून, त्यासाठी सुमारे ६२ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. रस्ते झाडणे, पादचारी मार्ग झाडणे, दुभाजक जेटिंग मशिनने स्वच्छ करणे याचा यामध्ये समावेश आहे. स्वीपरने रस्ते झाडताना धूळ उडणार नाही, रस्ते पूर्ण स्वच्छ होतील, याकडे पूर्ण लक्ष दिले जाईल.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
पाच वर्षात असा होणार परिमंडळनिहाय खर्च
वर्ष खर्च रुपयांमध्ये
१ - ३.८३ कोटी
२ - ३.९९ कोटी
३ - ४.१६ कोटी
४ - ४.३१ कोटी
५ - ४.५१ कोटी
एकूण - २०.८० कोटी