पुणे (Pune) : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना महापालिकेने आता या गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. समान पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जलवाहिनी टाकणे, टाक्या बांधणे अशी कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे या गावांमध्ये काम केले जाणार आहे.
राज्य सरकारने पुण्याच्या हद्दीलगतची २३ गावे ३१ जुलै २०२१ ला पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्यात समन्वय यावा, नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी महापालिकेने या गावांचा समावेश केला आहे. या भागात नव्याने होणाऱ्या बांधकामांच्या ठिकाणी प्रचंड पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. सोसायट्यांचे टँकरवर लाखो रुपये दर महिन्याला खर्च होत आहेत. या बांधकामांना पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे परवानगी देताना संबंधित ठेकेदारांना पाणीपुरवठा करावा, यासाठी त्याच्याकडून हमीपत्र घेतले होते. पण प्रत्यक्षात सद्यःस्थितीत नागरिकांनाच पाण्याची सोय करावी लागत आहे.
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती, त्यात न्यायालयाने महापालिकेला जोपर्यंत पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करा, असा आदेश दिला आहे. २३ गावांतील लोकसंख्येचा विचार करता वर्षाला यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेने या गावांत समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे व गावांमधील सध्या अस्तित्वातील यंत्रणा सुधारणे यावर भर दिला.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे या गावात जलवाहिनी टाकण्यासाठी ६ कोटी ५९ लाख ३६ हजार रुपयांचे टेंडर काढले आहे. तसेच या भागात पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बावधन भागातील जलवाहिनी आणि टाक्यांसाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या गावांतही होणार काम
लोहगाव-वाघोली, पिसोळी-वडाचीवाडी-हांडेवाडी, किरकटवाडी-नांदोशी, खडकवासला, नांदेड, नऱ्हे, धायरी, सणसवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी यासह इतर गावांचे पॅकेज केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने या कामासाठी टेंडर काढले जाणार आहे.
समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे येथे जलवाहिनी व टाक्या बांधल्या जातील. त्यानंतर बावधन भागात काम करून थेट पाणीपुरवठा केला जाईल. त्याच प्रमाणे लोहगाव-वाघोली या टप्प्याचेही काम लवकरच सुरू होईल. सर्व समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठ्याची योजना राबविली जाणार असून, यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग