पुणे (Pune) : टेंडर (Tender) प्रक्रियेतील गडबडींमुळे वादात सापडलेल्या ११ समाविष्ट गावांमधील मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सल्लागाराविना ठप्प झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, यापूर्वीचा सल्लागार केवळ आराखडा तयार करण्यापुरताच होता. प्रत्यक्ष कामासाठी वेगळा सल्लागार असणार आहे. मात्र, दीड महिन्यांपासून ही नियुक्ती लालफितीत अडकल्याने ३९२ कोटींचा प्रकल्प ठप्प झाला आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये शहराच्या हद्दीलगतची ११ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांमधील मैलापाण्याच्या व्यवस्थापनास प्राधान्य देण्यात आले. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी प्रायमुव्ह या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या संस्थेने ११ गावांचा अभ्यास करून महापालिकेला डीपीआर सादर केला. त्यानंतर प्रकल्पाचा खर्च सुमारे ३९२ कोटी रुपये निश्चीत करून त्यासाठी टेंडर मागवली होती. हे टेंडर अंतिम करताना त्यावरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले होते.
समाविष्ट ११ गावांत पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी ११ गावांमध्ये १६७ किलोमीटर लांबीची मैलावाहिनी टाकणे, मांजरी बुद्रूक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पात उरुळी देवाची, उंड्री, फुरसुंगी, मांजरी येथील मैलापाणी शुद्ध केले जाईल. तर मुंढवा येथील १२ एमएलडी प्रकल्पात केशवनगर, साडेसतरानळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे. या टेंडरला मान्यता मिळाल्यानंतर १३ मार्च रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर केवळ लोहगाव विमानतळाच्या परिसरात वाहून येणाऱ्या मैलापाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ते काम महापालिकेने तातडीने करून घेतले. पण उर्वरित ठिकाणचे काम सल्लागार नसल्याने ठप्प झाले आहे.
काय आहे पेच?
११ गावांमध्ये मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी महापालिकेने प्रायमुव्ह ही संस्था नियुक्त केली. प्रकल्पाचा डीपीआर सादर करताना प्रत्यक्ष काम सुरू होताना दुसरा सल्लागार नियुक्त केला जाईल, अशी अट टाकली. त्यामुळे सल्लागार नियुक्त करण्यासाठी टेंडर मागविले आहेत. त्यामध्ये दोन कंपन्यांनी टेंडर भरले असून, त्यांचे कागदपत्रांची पूर्तता करणारे ‘अ’ पाकिट उघडले आहे. पण आर्थिक विषयांशी संबंधित असलेले ‘ब’ पाकिट उघडण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रकल्पातील चुका टाळण्यासाठी सल्लागार आवश्यक आहे, असे सूत्रांनी सांगितले.
११ गावांच्या मैलापाणी यंत्रणा व प्रकल्पाचे काम करून घेण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात कामावर परिणाम झाला आहे. पण, सल्लागार नसतानाही विमानतळाच्या हद्दीतील काम महापालिकेने केले. उर्वरित काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
अशी असेल ड्रेनेज व्यवस्था
गाव - मैला वाहिनी लांबी (किलोमीटरमध्ये)
शिवणे उत्तमनगर - ६.९
धायरी - ९.५
आंबेगाव खुर्द- ९.५
आंबेगाव बुद्रूक - ९.२
उंड्री- ६.४
उरुळी देवाची - २३.८
साडेसतरानळी- १.८
फुरसुंगी - १७.४
केशवनगर - १०.३
लोहगाव - ६०
मांजरी बुद्रूक-१३
एकूण - १६७.५