पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील पाणी पुरवठ्याच्या सुमारे ३४ टेंडरला विलंब झाल्याचा ठपका ठेवत पाच अभियंत्यांसह एका लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर खुलासा करताना नव्याने वापरात आलेल्या ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीमुळे टेंडर काढण्यास उशीर झाला, असे कारण या अभियंत्यांनी दिले आहे.
पाणीपुरवठा विभागातर्फे प्रत्येक विभागातील देखभाल-दुरुस्तीची कामे, वॉल्व्ह सोडण्यासाठीचे मनुष्यबळ पुरविणे, टँकर पुरविण्याच्या कामासाठी दरवर्षी टेंडर काढले जातात. या टेंडरला यंदा पाच ते सहा महिने विलंब झाला. त्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांच्या ३४ टेंडर रखडले होते. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता.
यामध्ये दोन कार्यकारी अभियंता, तीन उपअभियंता व एका लिपिकास नोटीस देऊन खुलासा करण्याचा आदेश दिला होता. या सर्वांनी खुलासा केला आहे. त्यामुळे या अभियंत्यावर कडक कारवाई न करता समज देऊन सुधारणेची संधी द्यावी, असा अभिप्राय अतिरिक्त आयुक्तांकडे दिला गेला असल्याचे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.