पुणे (Pune) : कर्वेनगर ते सनसिटी दरम्यान मुठा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये आठ जणांना सात कोटी ४७ लाख ४१२ रुपये रोख नुकसानभरपाई दिली जाणार असून, त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. आनंदनगर, सनसिटी भागातील नागरिकांना स्वारगेट, डेक्कन किंवा कोथरूडला जाण्यासाठी संतोष हॉल चौकातच यावे लागते. इतर पर्यायी मार्ग नसल्याने मोठा हेलपाटा पडत आहे. या भागातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यातून सुटका करण्यासाठी कर्वेनगर ते सनसिटी या दरम्यान मुठा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यामध्ये कर्वेनगरच्या बाजूने भूसंपादनात अडथळे आले होते. तेथील जागा मालकांनी टीडीआर किंवा इतर स्वरूपात जागा ताब्यात देणारा नाही. रोख स्वरूपात मोबदला दिला तरच रक्कम दिली जाईल, असा आग्रह धरला होता. त्यामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली होती.
भूसंपादन कायद्यानुसार मोबदला न देता त्यापेक्षा कमी दराने तडजोडीने रोख स्वरूपात मदत करण्यावर एकमत झाले. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर केला. कर्वेनगरच्या बाजूने १२४२ चौरस मीटर जागा असून, त्याचे रेडीरेकनुसार ३ कोटी ७३ लाख ५० हजार २०६ इतके त्याचे मूल्यांकन होते. त्यावर तेवढीच दिलासा रक्कम म्हणजे एकूण ७ कोटी ४७ लाख ४१२ रुपये आठ जागा मालकांना देण्यात येणार आहे.