पुणे : मुदतीत बिले आदा केली नाही, तर थकीत बिलावर वार्षिक ३६ टक्के व्याजदाराने दंड, एलईडी दिव्यांमुळे बिलात बचत झालेल्या बिल रकमेच्या ९८.५ टक्के ठेकेदार कंपनीला आदा करणे, जुन्या फिटींग जमा करून न घेणे या सारख्या ठेकेदार कंपनीला सवलती देऊन महापालिका प्रशासन थांबले नाही. तर त्यापुढे पाऊल टाकत एलईडी दिवे नीट बसविले जात आहे की नाहीत, हे पाहण्यासाठी ५० लाख खर्च करून स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एनर्जी सेव्हींगसाठी शहरात ९० हजार एलईडी दिवे बसविण्याचे काम २०१७-१८ मध्ये महापालिकेने एका ठेकेदार कंपनीला दिले होते. या ठेकेदार कंपनीबरोबर महापालिकेकडून करार करण्यात आला होता. काही कामांचे बिल आदा करण्यास महापालिकेने उशीर केल्यामुळे म्हणून संबंधित ठेकेदार कंपनीने लवादाकडे तक्रार दाखल केली होती. एलईडी दिवे बसविण्याचे काम दिलेल्या ठेकेदार कंपनीबरोबर महापालिकेने केलेल्या करारामध्ये काही कारणाने बिल आदा करण्यास उशिरा झाल्यास प्रतिदिन ०.१० टक्के व्याजदाराने दंड आकरण्यास मान्यता दिली आहे. हा व्याजदर विचारात घेतला तर दहा दिवसासाठी एक टक्का आणि एका महिन्यासाठी तीन टक्के व वर्षासाठी ३६ टक्के एवढा येतो, ही धक्कादायक गोष्ट समोर आली होती.
त्या पाठोपाठ एलईडी बसवण्याचे काम होते अगर नाही हे पाहण्यासाठी महापालिकेला मिळणाऱ्या दीड टक्का या रकमेतून एक नवीन सल्लागार नेमण्यात आला. त्यासाठी सल्लागार कंपनीला देखरेखीसाठी पन्नास लाख रुपये शुल्क देण्याचे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सल्लागार कंपनीला बिल आदा करण्याऐवजी पहिल्या रनिंग बिलामध्ये ३५ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून वीजबचत करून महापालिकेच्या पैसा वाचविण्यासाठी हे काम देण्यात आले की ठेकेदार आणि सल्लागार यांचे भले करण्यासाठी प्रशासनाकडून हे काम करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य सरकारच्या आश्वासनपूर्ती समितीने विभागीय आयुक्तांना दिला आहे. या प्रकरणातील एक एक गैरप्रकार बाहेर येऊ लागल्याने त्यातून मान सोडून घेण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मदतीला काही अधिकारी धावून आले असून चौकशी समितीपासून काही कागदपत्रे लपवणे, अधिकाऱ्यांची नावे वगळणे असे प्रकार सुरू झाले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
एलईडी दिवे बसविण्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मुदत संपुष्टात येत आहे. चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. या संदर्भातील चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
- सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा चौकशी अधिकारी