पुणे (Pune) : फुरसुंगी येथील नवीन कालव्याच्या सुमारे ३२ हजार चौरस मीटर, म्हणजे सुमारे साडेतीन लाख चौरस फूट जागेचे रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान अपडेट झालेल्या रेकॉर्डची माहिती जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविली आहे. त्यामुळे बांधकामांना परवानगी देताना महापालिकेला येणारी अडचण दूर होणार आहे.
महापालिकेकडून फुरसुंगी येथील २६१ हेक्टरवरील ‘टीपी स्कीम’ राबविण्याचा इरादा मार्च २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता. ‘एमआरटीपी ॲक्ट’नुसार दोन वर्षांत या योजनेचे प्रारूप जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळ आणि लॉकडाऊन यामुळे योजना राबविण्यास महापालिकेने राज्य सरकारकडून मुदतवाढ घेतली. दरम्यान, १४ मार्च २०२२ रोजी महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आली. मुदत संपण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना फुरसुंगी ‘टीपी स्कीम’च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्याला गेल्या वर्षी १० मार्च रोजी झालेल्या सर्वसधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबरच ‘टीपी स्कीम’मधील क्षेत्रफळात दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली. २१ मार्च २०२२मध्ये त्यांचे प्रारूप जाहीर करण्यात आले. त्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार होता.
या दरम्यान फुरसुंगी येथे नवीन कालव्यासाठी जलसंपदा विभागाकडून जागा ताब्यात घेण्यात आली असली, तरी कागदोपत्री मात्र जागा खासगी मालकांच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. सुमारे ३२ हजार चौरस मीटर एवढी ही जागा आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेकडून जलसंपदा विभागाला पत्र देऊन रेकॉर्ड अपडेट करावे आणि त्याबाबतची सर्व कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावीत, अशी विनंती केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
विशेष पथकाकडून तपासणी
जलसंपदा विभागाकडून रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विशेष पथक स्थापन करून भूसंपादनाचे ॲवॉर्ड तपासणीचे काम हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर जे रेकॉर्ड अपडेट झाले आहे, त्यांची माहिती जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाठविण्यात आली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
जागा जलसंपदा विभागाची
फुरसुंगीमधून दोन कालवे वाहतात. एक कालवा ब्रिटिशकालीन असून ते १८७७ मध्ये बांधण्यात आला आहे. तर दुसरा नवीन कालवा हा १९६०मध्ये बांधण्यात आला आहे. कालवा बांधताना भविष्यात देखभाल-दुरुस्तीसह विविध आवश्यक ती कामे करणे, सोईचे जावे, यासाठी या जागेचे भूसंपादन करण्यात आले होते. नवीन कालव्यासाठी भूसंपादन प्रत्यक्षात झाले. परंतु कागदपत्रांमध्ये तसे बदल करून जलसंपदा विभागाच्या नावावर ती जागा झालेली नाही. त्यामुळे जागेच्या सातबारा उताऱ्यावर खासगी मालकाचे नाव असले, तरी प्रत्यक्षात ती जागा जलसंपदा विभागाची आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले
फुरसुंगी येथील नवीन कालव्याच्या जागेसंदर्भात महापालिकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जे रेकॉर्ड अपडेट झाले आहे, ते महापालिकेकडे माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.
- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग