पुणे (Pune) : महापालिकेत आता लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीत शहराला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळेच शहराची वाट लागली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर लोकांचे जीव जात असतानाही महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
प्रशासन, अधिकारी, कंत्राटदारांच्या साखळीला नागरिकांच्या जीवाशी देणेघेणे नाही. जोपर्यंत आधीची रस्ते दुरुस्ती उत्तम होत नाही, तोपर्यंत नवीन रस्ते दुरुस्तीचे नाटक बंद करा, अशा संतप्त शब्दांत शहरातील नागरिकांनी खड्ड्यांच्या प्रश्नांवर भावना व्यक्त केल्या. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरे, समाविष्ट गावांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र खड्डे दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.
नागरिक आक्रमक...
पावसाळ्यात खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असून, पादचारीदेखील सुरक्षित राहिलेले नाहीत. खड्ड्यात पाय गेल्यास हातपाय मोडण्याची भीती आहे. महापालिका मोठे खड्डे बुजविते, मात्र छोट्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. याबरोबरच खड्डे बुजवण्यासाठी हलक्या प्रतिचे डांबर वापरल्याने पुन्हा पुन्हा खड्डे पडतात. महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदार यांचे साटेलोटे असून, त्यांना नागरिकांच्या जीवाचे देणेघेणे नाही.
- रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ
शहरात सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. शहर व उपनगर खड्डेमय झाले असून, खड्डे बुजविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना बैठक घ्यावी लागते. त्यामुळे प्रशासकीय कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतके होऊनही खड्ड्यांची दुरुस्ती शास्त्रीय पद्धतीने होत नाही. वाहनचालकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागते. त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांकडून चांगले काम अपेक्षित होते, प्रत्यक्षात पुणेकरांच्या पदरी निराशाच पडत आहे.
- आदित्य गायकवाड
महापालिका अकार्यक्षम
पाषाण टेकडीमागील रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद केला आहे. साधा रस्ता बनवण्यासाठी महापालिकेस एक वर्ष लागते, त्यावरूनच महापालिकेची अकार्यक्षमता दिसते. याला स्मार्ट सिटी म्हणायचे का ? लोकांची गैरसोय करण्यात महापालिका क्रमांक एकवर असेल. तसेच सारसबाग प्रवेशद्वारासमोर संत तुकडोजी महाराज चौकात काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवले होते. आता तेथे पुन्हा खड्डे झालेले आहेत. वळणावरचा रस्ता असल्यामुळे विशेषतः दुचाकी वाहनांचा येथे अपघात होत असतो. तरी ते खड्डे पुन्हा व्यवस्थित बुजवले पाहिजेत, असे काही नागरिकांनी सांगितले.