पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खडी किंवा डांबराने खड्डे बुजत नसल्याने आता थेट पेव्हिंग ब्लॉकने खड्डे बुजविण्यात आले आहेत. रात्री वाहतूक कमी असताना खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे.
उड्डाण पुलाच्या कामामुळे विठ्ठलवाडी, हिंगणे, राजाराम पूल येथे सिंहगड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे पडले आहेत. कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात खड्ड्यांमुळे आणखी भर पडली आहे. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाड्या आदळत आहेत. यात दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत असते. संतोष हॉल चौक ते हिंगणे चौक, विठ्ठलवाडीपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीदेखील साचत आहे. तसेच विठ्ठलवाडी चौक ते हिंगणे चौक या दरम्यान रस्ता उंच-सखल झाला असून, खड्डे व पसरलेल्या खडीमुळे रस्ता धोकादायक झाला आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडी चौक या दरम्यान तसेच राजाराम पूल, शारदा पीठ येथेही खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता रात्रीच्या वेळी वाहतूक वळवून पेव्हिंग ब्लॉक बसवून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. अजून काही भागांतील काम बाकी आहे. पाऊस थांबल्याने या कामाला गती येणे आवश्यक आहे. दरम्यान, राजाराम चौकातील उड्डाण पूल पुढील काही दिवसांत सुरू झाल्यानंतर कर्वेनगरकडे जाणारा खालचा रस्ता व पादचारी मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची धास्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एकतानगरीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. मुख्यमंत्री येण्यापूर्वी उड्डाण पुलाच्या खाली पसरलेली खडी, पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आली. गेल्या महिन्यापासून या ठिकाणी खडी पडलेली असताना ती काढण्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आज हे काम युद्धपातळीवर करण्यात आले.