पुणे (Pune) : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग (Nagar Road BRT) तूर्तास काढला जाणार नाही. याबाबत घाईने निर्णय घेतला जाणार नाही, असे पुणे माहापालिकेचे (PMC) आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. या रस्त्यावरील वाहतूक आणखी सुरळीत कशी करता येईल यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेट्रोच्या खांबांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी बीआरटी काढण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पीएमपीएल प्रशासन यांनी बीआरटी काढण्यापेक्षा तिच्या सक्षमीकरणावर भर द्यावा, अशी भूमिका मांडली होती. त्यावरून पवार यांनी प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून निर्णय घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी बीआरटीची प्रत्यक्षात पाहणी केली.
त्यानंतर ते म्हणाले, "बीआरटीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या रस्त्यावरील वाहतुकीचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी एका संस्थेची नियुक्त केली जाईल. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला जाईल. बीआरटी अधिक सक्षम करणे, मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणांवरील कृत्रिम अडथळे हटविणे, प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस उपलब्ध करून देणे, पीएमपीएल बसेसची वारंवारिता वाढविणे, असे निर्णय तातडीने घेतले जातील.''
आंदोलनाचा इशारा
बीआरटी बंद न करता ती अधिकाधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. अन्यथा आंदोलनाची भूमिका घेऊ, असा असा इशाराही त्यांनी दिला.