पुणे (Pune) : पुणे-मिरज (Pune-Miraj) लोहमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. रेल्वेलाइनचे (Railway Line) कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरून रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतिमान प्रवासाची सोय होणार आहे.
रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन काम जवळपास पूर्ण केले आहे. पुणे/घोरपडी- सासवड रोड, सासवड रोड- फुरसुंगी, फुरसुंगी-आळंदी, दौंडज- वाल्हा, आळंदी-शिंदवणे, आंबळे-राजेवाडी, राजेवाडी-जेजुरी, जेजुरी-दौंडज आणि वाल्हा-नीरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. भराव, लहान-मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे प्रगतिपथात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
जमीनमालकांना ४७ कोटींचा मोबदला
या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात आली. उर्वरित खासगी जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया जुलै २०२२ पासून गतीने राबविली. २० ऑक्टोबरपर्यंत सहा गावांची भूसंपादनाची अधिसूचना जारी करून अंतिम निवाडे ३० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आले. राहिलेल्या वाल्हे या एका गावातील जमिनीची भूसंपादनाची अधिसूचना ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून नुकतेच हे निवाडे जाहीर करण्यात आले. या एकूण जमीन खरेदी व भूसंपादनाचा ४७ कोटी ४० लाख रुपयांचा मोबदला जमीनमालकांना देण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
हे आहेत प्रकल्पाचे फायदे
१) दुहेरी लोहमार्गामुळे रेल्वेवाहतूक वेगवान होणार
२) त्याचा फायदा दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, व्यापारी आदींना होणार
३) प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने शेतमाल तसेच अन्य नाशवंत माल लवकर बाजारपेठेत पोचणार
४) शेतमालाचे नुकसान कमी होऊन मालाला जास्त दर मिळू शकणार
५) क्रॉसिंगसाठीचा वेळ वाचणार असल्याने रेल्वे मार्गावरील गावातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत
सर्व जमीन रेल्वे बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही आठ महिन्यांतच पूर्ण केली. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली. महसूल, वनविभाग, रेल्वे तसेच नगररचना व मूल्यांकन विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वेला या जमिनीचा ताबा गतीने देता आला.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
असा आहे प्रकल्प...
- पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेची एकूण २८० किलोमीटरपैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी ३५ किलोमीटर
- यासाठी जिल्ह्यातील १४ गावांतील एकूण १८ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती
- त्यात पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी या नऊ गावांचा समावेश
- हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती या तीन गावांचा समावेश
- दौंड तालुक्यातील डाळिंब व ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश
- भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी १३ हेक्टर १० गुंठे खासगी जमीन
- ०.३४७५ आर सरकारी जमीन
- चार हेक्टर ५५ गुंठे वनजमीन