पुणे (Pune) : पुणे व पिंपरी चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) शहरातील ५ हजार ९१५ सदनिकांच्या (Flats) बंपर सोडतीसाठी उद्यापासून (ता. ५) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया म्हाडाकडून (MHADA) सुरू करण्यात येत आहे. या घरांची सोडत १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी बुधवारी दिली.
म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर ४ फेब्रुवारीपर्यंत नागरिक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. म्हाडाच्या विविध योजनेतील २ हजार ५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ९९० सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५ हजार ९१५ सदनिकांसाठी सोडत असेल. तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २ हजार ९२५ घरे उपलब्ध आहेत, अशी माहिती माने पाटील यांनी दिली.
सोडतीचे वेळापत्रक
५ जानेवारी - ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात
७ जानेवारी - ऑनलाइन पेमेंट स्विकृती सुरवात
४ फेब्रुवारी - ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम मुदत
५ फेब्रुवारी - सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास अंतिम मुदत
६ फेब्रुवारी - ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम स्विकृती अंतिम मुदत
१५ फेब्रुवारी - सोडतीसाठी अंतिम अर्जांची यादी प्रसिद्ध
१७ फेब्रुवारी - सदनिकांची सोडत
...अशी करा नोंदणी
यंदा म्हाडाने सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार नागरिकांना घरबसल्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून नोंदणी, अर्ज भरणे, ऑनलाइन पेमेंट या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे किंवा गुगल प्ले स्टोअर मधून MHADA IHLMS २.० या मोबाईल ॲपमधून नोंदणी करता येईल.
म्हाडाने घरांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून ती सातवर आणली आहे. अर्ज करतेवेळी ही सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या अर्जाची छाननी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होईल. या सात कागदपत्रांमध्ये तहसिलदारांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना अधिवास प्रमाणपत्र वेळेत मिळावे व यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची विनंती करणार आहे.
- नितीन माने पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा पुणे विभाग