पिंपरी (Pimpri) : पिंपरी ते निगडीपर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पीएमपीएमएल बसचे थांबे तात्पुरते हटविण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे थांबे लावण्यात येतील, असे पीएमपीएमएलकडून सांगण्यात आले.
आकुर्डी, मोरवाडीसह चिंचवड स्टेशन येथील जुने बसथांबे हटविण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ऐंशीहून अधिक नवीन स्टेनलेस स्टीलचे बस शेड बसविले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पंधरा बस शेड आहेत. यातील नऊ बस शेड हे निगडी दापोडी बीआरटी मार्गाला समांतर मार्गावर बसविले आहेत. मात्र, त्यानंतर बस थांबा उभारण्याचे काम थांबले होते.
जागेचे सर्वेक्षण त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे थांबे उभारण्यात येत नव्हते. तर आता उभारलेले नवीन थांबे देखील काढण्यात आले आहेत.
पाच महिन्यांपूर्वी आकुर्डीत लाखो रुपये खर्चून उभारलेले बस शेड काढले आहेत. हिंजवडी येथील शिवाजी चौक, बाणेर रस्ता येथील बस थांबा काढून टाकण्यात येणार आहे. याबाबत मेट्रोकडून पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
मेट्रोकडून पीएमपी प्रशासनाकडे तसेच, वाहतूक नियोजन विभागाकडे बस थांबे हटविण्याबाबत पत्र प्राप्त होते. ते बस थांबे तात्पुरते दुसरीकडे स्थलांतर केले जातात अथवा काढून ठेवण्यात येतात. काम झाल्यानंतर पुन्हा बसविण्यात येतील, अशी माहिती पीएमपीएमएलचे कार्यकारी अभियंता डी. एम. तुळपुळे यांनी दिली.