पुणे (Pune) : पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर गेल्या आठवड्यात ट्रायल रन यशस्वी झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रवासी वाहतूक सुरू होईल. त्याचा सर्वाधिक फायदा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना होणार असून, स्वारगेटसह पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठा, मंडई, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयांत जाणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होणार आहे.
पुणे मेट्रोच्या दोन मार्गिका आहेत. स्वारगेट ते पिंपरी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन अर्थात पीसीएमसी) आणि पुण्यातील वनाज ते रामवाडी असे हे मार्ग आहेत. दोन्ही मार्गांवरील पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रूबी हॉल क्लिनिक या स्थानकांपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. वनाज ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले असून केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्याची पाहणी केली आहे.
शिवाय, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयार मार्गावर गेल्या आठवड्यात ट्रायल रनही यशस्वी झाली आहे. त्यामुळे हा मार्गही लवकरच खुला होणार असल्याने पिंपरीतून थेट स्वारगेट प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय, सिव्हिल कोर्ट स्थानकात उतरून उन्नत मार्गाने रूबी हॉल क्लिनिक, बंडगार्डन, येरवडा, रामवाडीपर्यंत जाणे शक्य होणार आहे.
सद्यःस्थितीत प्रवास...
पिंपरी-चिंचवडमधील नागरिक पीसीएमसी स्थानक ते शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतात. तेथून इच्छितस्थळी जावे लागत आहे. पिंपरी-चिंचवडमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी पीएमपी बससेवा नाही. या बस डेक्कन, दांडेकर पूल, सारसबाग मार्गे जातात. त्यामुळे मध्यवर्ती भागात जाणाऱ्या प्रवाशांना पीएमपीने गेल्यास पुणे महापालिका भवन स्थानकावर किंवा शिवाजीनगरला उतरून छत्रपती शिवाजी रस्त्याने जाणाऱ्या बसने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. मेट्रोने गेल्यास शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्ट स्थानकात उतरून पीएमपी किंवा रिक्षाने जावे लागते.
स्वारगेटपर्यंत मेट्रोचा फायदा
पीसीएमसी स्थानकातून स्वारगेटपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पुण्याच्या मध्यवस्तीत जाणे सहज शक्य होईल. यामध्ये शनिवारवाडा, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, लाल महाल, विश्रामबाग वाडा, भिडेवाडा, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडीयम, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, नारायण पेठ आदी भागांचा समावेश आहे.
असे आहे अंतर (किलोमीटरमध्ये)
पीसीएमसी ते फुगेवाडी ः ७
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट ः ६
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ः ४
पीसीएमसी ते स्वारगेट ः १७
(आधी पीसीएमसी ते फुगेवाडी, नंतर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट सेवा सुरू झाली. आता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट सेवा प्रस्तावित आहे. भविष्यात पीसीएमसी ते भक्ती-शक्ती निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. त्याबाबत सरकारही सकारात्मक असून त्याला मान्यता मिळालेली आहे. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झालेला नाही.)
पीसीएमसी ते वनाज किंवा रामवाडी
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ः १३
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ते वनाज ः २१
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ते रूबी हॉल ः १६
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट ते रूबी हॉल ते रामवाडी ः २१
(सद्यःस्थितीत सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात उतरून उन्नत मार्गावरील स्थानकावर यावे लागत आहे. तेथून रूबी हॉल क्लिनिक किंवा वनाजपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. या मेट्रो सेवेमुळे कर्वे रोड, कोथरूड, कर्वेनगर, आनंदनगर, वनाज भागात जाणे शक्य होत आहे. रूबी हॉलपासून रामवाडी सेवा सुरू झाल्यास बंडगार्डन, येरवडा, नगररोड, रामवाडी, शास्रीनगर भागात जाणे शक्य होईल.)
पीसीएमसी ते निगडी विस्तार झाल्यास...
पीसीएमसी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग विस्तारीकरणास मान्यता मिळाली आहे. त्याचा विकास कृती आराखडा (डीपीआर) तयार आहे. हा मार्ग झाल्यास चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, तळवडे, चिखली, मोहननगर, संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.
माझे ऑफिस डेक्कन परिसरात आहे. त्यामुळे पिंपरीतून सिव्हिल कोर्ट आणि तेथून बालगंधर्व स्थानकात उतरून कामावर जातो. परतीचा मार्गही असाच आहे. येऊन-जाऊन ६० रुपये तिकिटाला लागतात. पीएमपीपेक्षा मेट्रो परवडते. शिवाय, उन्हाचा त्रास होत नाही.
- उमेश वाघ, पिंपरी
सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी ही ऐतिहासिक घटना आहे. यामुळे येत्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक (पीसीएमसी) ते स्वारगेट स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो