पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो विस्तारणार ६६ किलोमीटर लांबीचे जाळे

Metro
MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण ६६ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.

Metro
लष्कराची मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक हायस्पीडच्या मार्गात बदल

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा २८ किलोमीटरचा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Metro
सावधान! चक्क डोंगर म्हातारा होतोय; २०० भूखंडांसाठी सिडकोकडून...

त्यावर मध्यंतरी झालेल्या पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटीच्या (पुमटा) बैठकीत शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यान पीएमआरडीएने तयार केलेला प्रकल्प अहवाल महामेट्रोने सुधारित करावा. तो करताना खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते खडकवासला या मार्गाचा समावेश त्यामध्ये करावा. त्याचबरोबरच हडपसर ते सासवड आणि हडपसर ते खराडी या दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाबाबतचा विचार करावा. हा सुधारित अहवाल तयार करून पुन्हा पुमटापुढे सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गाचे ४३ किलोमीटर विस्तारीकरण करणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यास पुमटाची मान्यता घेऊन तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Metro
पुणे रेल्वे स्टेशनवरील अपुऱ्या सुविधांमुळे चार ठेकेदारांना दंड

असे होणार मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण

- पहिला आणि दुसरा टप्पा : ६६ किलोमीटर

- हिंजवडी ते शिवाजीनगर : २३ किलोमीटर

- अहवाल येणे अपेक्षित : ४३ किलोमीटर

प्रस्तावित मार्गांचे पुढील टप्प्यात नियोजन

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. हाच मार्ग पुढे वाघोलीपर्यंत नेण्याचा तसेच एक फाटा खराडीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. तर खराडी ते हडपसर असा आणखी एक मार्ग प्रस्तावित आहे. परंतु, या मार्गांचे पुढील टप्प्यात नियोजन आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com