पुणे (Pune) : पुणे मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारी ‘एक पुणे ट्रान्झिट कार्ड’ उपलब्ध केले आहे. या कार्डसाठी प्रवाशांना ‘केवायसी’ करण्याची गरज नाही.
तसेच या कार्डचे हस्तांतर करता येणार असल्याने कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वापर करता येऊ शकणार आहे. अन्य कार्डप्रमाणेच यावर सोमवार ते शुक्रवार १० टक्के आणि शनिवार व रविवारी प्रवासावर ३० टक्के सवलत मिळणार आहे.
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी यापूर्वी ‘एक पुणे’ व ‘विद्यार्थी पास’ असे दोन कार्ड सुरु केले. एक पुणे कार्ड ४६ हजार ६५९ प्रवाशांनी घेतले तर १५ हजार ८६५ जणांनी विद्यार्थी पास घेतले. या दोन्ही कार्डसाठी ‘केवायसी’ अनिवार्य आहे. मात्र ट्रान्झिटसाठी केवायसीची आवश्यकता नाही.
हे कार्ड खरेदी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तसेच हे कार्ड फक्त प्रवासासाठी असून याचा उपयोग प्रवासाव्यतिरिक्त अन्यत्र करता येणार नाही. याची वैधता पाच वर्षे असून किंमत ११८ रुपये आहे. या कार्डमध्ये एकावेळेस तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम टॉप-अप करता येऊ शकते. त्यासाठी पुणे मेट्रो ॲपद्वारे किंवा मेट्रो स्थानकांवर ग्राहक सेवा केंद्रात सुविधा आहे.
मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘देशात प्रथमच नॉन केवायसी हस्तांतरीय ट्रॅव्हल कार्ड प्रवासी सेवेत दाखल होत आहे. ही नक्कीच पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पुणे मेट्रोमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट खरेदी होत आहे.’’