पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) फलाट सहाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. फलाट सहाच्या विस्तारीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या ‘ट्रीप शेड’ पाडून नव्या जागेत स्थलांतर केले जाईल.
नव्या ठिकाणी ट्रीप शेड बांधण्यासाठी सुमारे ४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये ‘आर अँड डी’ (रिसिव्हिंग अँड डिस्पॅच) लाइनवर दोन लाइनचे नवे ट्रीपशेड बांधले जाईल.
पुणे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चा भाग असलेल्या फलाट ६ च्या विस्तारीकरणाच्या कामात ‘ट्रीप शेड’चा मोठा अडथळा निर्माण झाला होता. ‘ट्रीप शेड’चे स्थलांतर आवश्यक होते, मात्र त्यासाठी जागा उपलब्धत होत नव्हती. रेल्वे प्रशासनाने यासाठी तीन विभागांची समिती स्थापन केली. त्या समितीचा नुकताच अहवाल आला असून, त्यात यार्डमधील ‘आर अँड डी’ जागा यासाठी निवडली आहे.
रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम होणार असून, त्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेला देखील सुरुवात होत आहे. दोन ते तीन महिन्यांत नवे ‘ट्रीप शेड’ बांधून तयार होईल, त्यानंतरच जुने ‘ट्रीप शेड’ पाडून फलाट सहाच्या विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात होईल.
असा होणार फायदा
- फलाट ६ चा विस्तार झाल्यावर तिथे २४ डब्यांची रेल्वे थांबेल
- सध्याचा फलाट लांबीने लहान असल्याने १७ ते १८ डब्यांची रेल्वे थांबते.
- २४ डब्यांचा फलाट झाल्यावर लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबतील, परिणामी फलाट १ वरचा ताण कमी होईल.
- गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.
- प्रवाशांच्या वेळेत बचत होईल, डब्यांची संख्या वाढविणे शक्य
नव्या ‘ट्रीप शेड’ची जागा ठरली असून, येत्या काही दिवसांत कामास सुरुवात होईल. हे काम झाल्यावर यार्ड रिमॉडेलिंगच्या उर्वरित कामांना सुरुवात होईल.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे