पुणे (Pune) : मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती मेट्रोनेच करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत (PMC) बैठक झाली. ठरलेल्या कराराप्रमाणे मेट्रोने स्टेशनच्या खालचा व स्टेशनपासून दोन्ही बाजूला २०० मीटर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मेट्रोला दिले.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने महापालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असले तरी अद्याप अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरीही चांगले रस्ते पुणेकरांना कधी मिळणार असा प्रश्न कायम आहे. खराब रस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, त्याचाही समावेश आहे. वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम सुरू करताना येथे मेट्रोच्या कामामुळे खराब होणारे रस्ते मेट्रोनेच दुरुस्त करावेत, असे ठरलेले आहे. भर पावसाळ्यात खड्डे पडलेले असताना रस्ते दुरुस्तीकडे मेट्रोने दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेनेच तेथे काम केले होते. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत दोन्ही संस्थांनी वाद न घालता त्वरित रस्ते दुरुस्त करून घ्यावेत. त्यानंतर खर्चाचा हिशोब करा, असे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभाग व मेट्रोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मेट्रोच्या कामाला परवानगी देतानाच मेट्रो स्टेशनच्या खालचा १४० मीटर आणि स्टेशनच्या दोन्ही बाजूला २०० मीटर पर्यंत असे एकूण ५४० मीटर पर्यंतच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती मेट्रोने करावी असे ठरलेले आहे, पण रस्ते दुरुस्ती होत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची भूमिका मांडली. त्यावर आयुक्तांनी सध्या जेथे डांबरी रस्त्यांना किंवा सिमेंटच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, ते दुरुस्त करून घ्या. नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. १५ आॅक्टोबर नंतर कर्वे रस्ता, आरटीओ, जहाँगीर, बंडगार्डन, नगर रस्ता येथे दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. तसेच पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते बाणेर दरम्यान येथे रस्ते खराब झाले ते दुरुस्त केले जाणार आहेत, असे पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.