पुणे (Pune) : वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाणपुलाखाली (Flyover) बेकायदा वाहनतळ उभारले असल्याने या पुलाखालून नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या बेकायदा थांब्यावर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वारजे माळवाडीमध्ये गर्दी होऊ नये म्हणून महामार्गालगत असणाऱ्या सोसायटीधारकांना शहरात लवकर जाता यावे, यासाठी माई मंगेशकर रुग्णालयासमोर महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल तयार केला. आता या उड्डाणपुलाखालून अतुलनगर, राहुल पार्क, रुणवाल, पॉप्युलरनगर, गिरिधरनगर, गार्डन सिटी अशा अनेक सोसायटीधारकांना या पुलाखालून जाणे सोपे झाले आहे. मात्र, या पुलाखाली भररस्त्यावर अनेक वाहने थांबत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे कठीण झाले आहे. येथे काही नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधीही पसरली आहे. वाहने असल्याने कचरासेवकांना येथे सफाई करता येत नसल्याचे चित्र आहे. वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या असलेल्या वाहनांमुळे ३० ते ४० टक्के रस्ता अडवला जातो. येथे वाहनाच्या रांगा लागत असल्याने उड्डाणपुलाखालील मार्ग वाहने थांबविण्यासाठी बनविला आहे की नागरिकांना प्रवास करणे सोपे जावे यासाठी बनवला आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
उड्डाणपुलाखाली येण्या-जाण्यासाठी रस्ता बनविला आहे. मात्र, याच रस्त्यावर वाहनांचे पार्किंग झालेले दिसून येते. २४ तास वाहने येथे लागत असल्याने या रस्त्याचा वापर प्रवाशांना करता येत नाही. त्यामुळे येथे लावलेल्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
-अमित सोंडकर, स्थानिक नागरिक
उड्डाणपुलाखाली लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करून ही वाहने काढली जातील.
-विशाल पवार, सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग
...................