पुणे, ता. २८ ः ‘‘नद्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केवळ त्यांचा विकास करणे आवश्यक नसून नदीचा पुनर्जन्म करणे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. त्यात सातत्य राखले जावे. तसेच नद्यांना पुन्हा स्वच्छपणे प्रवाहित करण्यासाठी नद्यांच्या सद्यःस्थितीचा अहवाल तयार करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
‘पुणे रिव्हर रिवायवल’ संस्थेच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ६० हून अधिक संस्था आणि व्यक्तींची ही संघटना आहे. संघटनेकडून भीमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या सात नद्यांसाठी ‘नद्यांचे हक्क, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
‘जलबिरादरी’चे अध्यक्ष नरेंद्र चुग, समन्वयक डॉ. सुमंत पांडे, संस्थेचे सचिव संतोष ललवाणी, शैलजा देशपांडे आणि मुकुंद मावळणकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, ‘‘गेल्या १०० वर्षांत पुराचे पाणी तेथपर्यंत गेले आहे ते भाग शोधले गेले पाहिजे. नदीचा प्रवाह अडथळ्याविना असावा. नदीचे आरोग्य व तिची स्वच्छता राखली पाहिजे. या तीन अधिकारांवर तडजोड करता येणार नाही. ज्या दर्जाचे पाणी आपण पितो त्याच दर्जाचे पाणी नदीस सोडले गेले पाहिजे. सांडपाण्याची प्रक्रिया काटेकोरपणे केली जात नाही. त्यावेळी नद्या, सांडपाणी आणि रासायनिक पाणी हे वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
नदी प्रदूषणाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी महाविद्यालयांमध्ये तर तरुणांनी शाळापातळीवर जनजागृती करावी. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी कमीत कमी पाच शाळांमधील विद्यार्थ्यांनी नदी काठावर भेट देऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. आगामी काळात अशा प्रकारची मोहीम राबवून नदीमधील स्वच्छता राबविणे आवश्यक आहे.’’
सातशे दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण
नद्यांच्या हक्कांसाठी पुण्याच्या नागरिकांनी ७०० दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण केले आहे. त्यानिमित्त नदीकाठावर काही ठिकाणी २४ तास सामूहिक उपवास करण्यात आला. साफसफाई, सेल्फि आणि ब्लॉग, पथनाट्ये किंवा इतर प्रकारची कला प्रदर्शने आदी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेल्फि विथ द रिव्हर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.