पुणे (Pune) : बंगळूर शहरात सर्वाधिक उद्याने आहेत. मात्र बंगळूरमधील उद्यानांनी व्यापलेल्या क्षेत्राहून अधिक क्षेत्र पुण्यात आहे. असे असले तरी याच उद्यानांच्या देखभाल-दुरूस्तीची अवस्था मात्र विदारक आहे.
देशात सर्वाधिक ३५० उद्याने बंगळूर शहरात असून ती ४५० एकर क्षेत्रात आहेत. याउलट पुण्यात २११ उद्याने असून ती ६५० एकर क्षेत्रात आहेत. अशा प्रकारे पुण्यात उद्यानांचे क्षेत्र मोठे असल्याचे समाधानकारक चित्र आहे. परंतु, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.
शनिवार पेठेतील नाना-नानी पार्क त्यापैकी एक उदाहरण आहे. या उद्यानात सांडपाणी वाहिनीचा पाइप फुटून मैलापाणी लहान मुलांच्या खेळण्यांखालून जात आहे. त्यामुळे लहान मुलांसह उद्यानात फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या नाना-नानी पार्कमध्ये पाइप फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत दत्तात्रय वाव्हळ यांनी नोव्हेंबरमध्ये महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार (क्रमांक - WA १३२४३२) नोंदविली आहे. याविषयी ते म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटण्याऐवजी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. अधिकारी अजूनही ठोस कारवाई करत नाहीत.’’
नाना-नानी पार्कमधील वैज्ञानिक खेळणी खराब झाली असून मुलांची खेळणी जुनी व खराब झाली आहेत, तरीही दुरुस्ती होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
तुटकी-फुटकी खेळणी
शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाची व मोजकी उद्याने वगळता बहुतांश भागातील उद्यानांची अवस्था दयनीय आहे. पेशवे ऊर्जा पार्कमधील साहसी खेळण्यांना गंज चढला असून अनेक खेळणी खराब झालेली आहेत. खेळण्यांची नियमीत स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने मुलांच्या आरोग्यासह सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सारसबागेत स्वच्छता असली तरीही मुलांची खेळणी, व्यायामाचे साहित्य तुटक्या-फुटक्या अवस्थेत आहे. ‘हिरकणी कक्ष’ कुलूपबंद असून शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद पडली आहे. क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय’ शिल्पही धुळखात पडले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराभोवतीच्या तळ्यातील विद्युत कारंजे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. संबंधित काम विद्युत विभागाचे असल्याचे सांगून उद्यान विभागाने हात झटकले आहे. खेळणी, व्यायामाच्या साहित्याभोवतीची झाडेझुडपे, गवतही काढले जात नाही.
याबरोबरच अनेक उद्यानामधील खेळणी, वैज्ञानिक व साहसी खेळणी तुटक्या-फुटक्या अवस्थेत आहेत. काही उद्यानांमध्ये खेळण्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. खेळण्यांभोवती माती, वाळू नसल्याने अनेकदा मुले खेळताना किरकोळ जखमी होण्याच्याही घटना घडत आहेत.
देखभाल दुरुस्ती कशाची?
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये २०२२-२३ या वर्षासाठी उद्यान विभागासाठी नऊ कोटी ४९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, नवीन उद्याने असा नियमीत खर्च वगळल्यास बहुतांश खर्च देखभाल-दुरुस्तीवर होतो. परंतु वर्षानुवर्षे उद्यानांमधील खेळणी, व्यायामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात खराब होऊनही बदलले जात नाही. उद्यानांमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोगही केले जात नाहीत. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती कशाची होते आणि खर्च नेमका जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
उद्यानांमधील सद्यःस्थिती
- खाद्यपदार्थ विक्रेते, टवाळखोरांचा वावर वाढला
- स्वच्छतागृहांमध्ये कमालीची अस्वच्छता
- वर्षानुवर्षे खेळण्यांची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी केली जात नाही
- वाहनतळाच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय
- कुत्रे व मोकाट जनावरांचा वावर
- पेट्यांमधील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष
नाना-नानी पार्कमधील पाइप फुटण्याच्या तक्रारीची दखल घेऊन क्षेत्रीय कार्यालयाला कळविले. त्यांनी संबंधित घर मालकास नोटीस बजावली आहे. दोन-तीन दिवसांत ते काम होईल. प्रत्येक उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. काही कामे अन्य विभागांशी संबंधित असतात, त्यामुळे त्यांना सूचना दिल्या जातात.
- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग, महापालिका