पुणे (Pune) : मुंबई-बंगळूर (Mumbai-Bengaluru) महामार्गावर नवले पुलाजवळ (Navale Bridge) अपघात होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने (PMC) उशीरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरूवात केली आहे. मात्र, कात्रज चौक ते कात्रज घाट आणि कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, लॉजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण, मद्यपींचा वाढता वावर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसरात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.
संबंधित हॉटेल्स, बार, लॉजमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून रस्त्यावरच धिंगाणा घालतात. त्यातून शिवीगाळ, भांडणे होतात. महामार्गालगतच्या अनेक बार, लॉजच्या परिसरात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहने तेथेच थांबतात. रात्रीच्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरूण मद्यपान करून महामार्गावर स्टंटबाजी करतात. त्यातून अपघात होतात.
हॉटेल्स, लॉज, बारच्या बाहेरील सेवा रस्त्यावर रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. संबंधितांना जाब विचारल्यास आम्हाला धमकाविले जाते. त्यामुळे आम्हाला नाइलाजास्तव सेवा रस्त्याऐवजी महामार्गावरून घरी जावे लागते. महापालिका, पोलिस यांच्याकडून संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नाही.
- विनोद कचरे, स्थानिक नागरिक