पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) सुमारे २० बांधकाम प्रकल्पांमध्ये आत्तापर्यंत ‘फायर टॉवर’ (Fire Tower) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, तर नव्याने होणाऱ्या उंच इमारतींना यापूर्वीच ‘फायर टॉवर’ यंत्रणा बसविणे बंधनकारक केलेले आहे.
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) पाठोपाठ पुण्यामध्येही गेल्या काही वर्षांत उंच इमारती बांधल्या जात आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (PMRDA) शहरात सध्या ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या (२० मजली) इमारतींना परवानगी आहे. तर १२० ते १३० मीटर उंचीच्या (४० ते ४५ मजली इमारती) बांधकाम प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. या उंच इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी इमारतीअंतर्गत अद्ययावत आग प्रतिबंधक यंत्रणा बसविली जात आहे.
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) नव्याने होणाऱ्या सर्व उंच बांधकाम प्रकल्पांना २०२२ पासून ‘फायर टॉवर’ यंत्रणा सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात, उंच इमारतींना आग लागल्यास अग्निशामक दलाची मदत पोचण्यापूर्वी नागरिकांचा जीव वाचविणे आणि वित्तहानी रोखण्यासही मदत होणार आहे.
काय आहे ‘फायर टॉवर’?
आगीच्या घटनेवेळी लिफ्टचा वापर केल्यास धुरामुळे त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन लिफ्टचा वापर टाळण्यास सांगितले जाते. मात्र इमारतीच्या लिफ्ट व पायऱ्यांमध्ये हवेचा दाब निर्माण केला जातो. परिणामी आगीमुळे निर्माण होणारा धूर लिफ्ट व पायऱ्यांपर्यंत (फायर टॉवर) जात नाही. त्यामुळे नागरिकांना लिफ्टचा वापर करून बाहेर पडणे किंवा अग्निशामक दलाच्या जवानांना आगीच्या ठिकाणी पोचून नागरिकांची सुटका करणे शक्य होते. फायर टॉवरमुळे मनुष्यहानीचे प्रमाण कमी होते.
‘ब्रांटो’ची मदत
आगीच्या घटनेच्या वेळी इमारतीच्या २० ते २२ व्या मजल्यापर्यंत पोचून नागरिकांची सुखरूप सुटका करणारी तीन वाहने (ब्रांटो) महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे आहेत. मात्र, त्यापेक्षा अधिक उंचीची वाहने दलाकडे उपलब्ध नाहीत. परंतु, हवेच्या वेगामुळे ५० मीटरपेक्षा जास्त उंचीवर ब्रांटो वाहनांवरील शिडी हेलकावे घेऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने परदेशात त्याचा वापर होत नाही. त्यामुळे आपल्याकडेही उंच इमारतींमध्ये ब्रांटो वाहनांचा वापर करण्यापेक्षा उंच इमारतीअंतर्गत आग विरोधी यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
ब्रांटो वाहनांवरील शिडीला हवेचा फटका बसतो. मात्र, आगीमुळे निर्माण झालेला धूर ‘फायर टॉवर’मुळे पायऱ्या व लिफ्टपर्यंत येऊ शकणार नाही, त्यामुळे नागरिकांची सुटका करणे व अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणणे शक्य होणार आहे.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पुणे महापालिका