पुणे (Pune) : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्कीमला (TP Scheme) अंतिम मान्यता मिळाल्यानंतर आता फुरसुंगी येथे आणखी एक टीपी स्कीम केली जाणार आहे. या २३८ हेक्टर क्षेत्रावरील टीपी स्कीमच्या प्रारूप आराखड्यावर १९१ हरकती सूचना आल्या आहे. त्यानुसार हा सुधारित आराखडा राज्य सरकारकडे म्हणजेच नगररचना संचालक पाठविण्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या स्कीमला मार्च २०१९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता, कोरोनामुळे आधीच विलंब झालेला असताना त्यात परत ही जागा एका बांधकाम व्यावसायिकाच्या वादग्रस्त प्रकल्पाच्या अंतर्गत येत होती, त्यामुळे हा भाग वगळण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळे या कामास विलंब झाला.
अखेर या कामाचा प्रारूप आराखडा तयार केला. त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या. त्यावर १९१ हरकती नोंदविल्या आहेत. त्यानुसार यामध्ये दुरुस्त्या करून आराखडा शहर सुधारणा समितीपुढे आलेला असताना त्यास मान्यता देण्यात आली. तसेच ‘वन के’ या नियमाखाली सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यास मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे तथा नगर रचना संचालक यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
स्कीम अडकली १० तांत्रिक अडचणींमध्ये
पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांत टीपी स्कीम झालेली नाही. त्यामुळे नियोजित विकासाला खीळ लागली होती. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठे क्षेत्र उपलब्ध असल्याने महापालिकेने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यात उरुळी देवाची, फुरसुंगी या समाविष्ट गावांतून बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) जात असल्याने त्याच्या दुतर्फा टीपी स्कीम करण्याचा निर्णय घेतला आहे.
उरुळी देवाची टीपी स्कीम क्रमांक आठ आणि फुरसुंगी टीपी स्कीम क्रमांक नऊ त्यास अंतिम मान्यता मिळाली असून, सध्या ऑर्बीटेटर नियुक्त करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. पण फुरसुंगी येथील टीपी स्कीम १० तांत्रिक अडचणींमध्ये अडकली होती.