पुणे (Pune) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMP) ताफ्यात ऑगस्ट महिन्यात नव्या १९२ वातानुकूलित बस (AC Buses) दाखल होत आहेत. या बस निगडी, चऱ्होली व कोथरूड डेपोतून विविध मार्गांवर धावतील. वाहतूक विभागाकडून सध्या अशा मार्गांचा अभ्यास सुरू आहे.
सद्यःस्थितीतील मार्गांबरोबर नवीन मार्गदेखील सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांच्या सेवेत या नवीन बस दाखल होणार असल्याने ‘पीएमपी’चा वरचा ताणदेखील काही प्रमाणात कमी होईल. शिवाय रोज सुमारे पावणे दोन लाख प्रवाशांची सोय होणार आहे.
हैदराबाद येथील ओलेक्ट्रा कंपनीत सध्या या बसची बांधणी सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्या ‘पीएमपी’ला मिळतील. ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस दाखल होणार होत्या. २०१८ मध्ये पहिल्या टप्यात १५० बस दाखल झाल्या. फेम-२ अंतर्गत १५० मिळाल्या, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या वतीने ३५० बस देण्याचे ठरले. त्यापैकी १५८ बस यापूर्वीच ‘पीएमपी’ मिळालेल्या आहेत. उर्वरित १९२ मिळणार आहेत. दाखल होणाऱ्या नव्या बस १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक स्वरूपाच्या आहेत.
प्रवाशांना दिलासा
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या धावणाऱ्या बहुतांश बसचे आयुर्मान संपलेले आहे. येत्या काही महिन्यांत सुमारे दोनशेहून अधिक बसचे आयुर्मान संपणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या १९२ बस दाखल होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सध्या ब्रेकडाउनचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनदेखील नव्या बसच्या प्रतिक्षेत आहे.
मेट्रो फिडर बससेवेचे नियोजन
‘पीएमपी’ प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या काही दिवसांत मेट्रो स्थानकावरून फिडर सेवा सुरू करत आहे. तत्पूर्वी मेट्रो स्थानकांची पाहणी करण्यासाठी ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी शुक्रवारी शिवाजीनगर न्यायायला मेट्रो स्थानकाची पाहणी केली. या वेळी महामेट्रोचे परिचालन व्यवस्थापक मनोज कुमार डॅनिअल यांची उपस्थिती होती. या वेळी फिडर सेवेबद्दल चर्चा झाली.
ऑगस्ट महिन्यात १९२ बस दाखल होत आहेत. त्या इलेक्ट्रिक असल्याने इलेक्ट्रिक डेपोतूनच सुटतील. कोथरूडसारख्या महत्त्वाच्या डेपोत चार्जर पॉइंट सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नव्या बस कोथरूड डेपोतूनदेखील सुटतील.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी, पुणे