Pune : खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणी व्यवहारांत मुद्रांक शुल्क कमी भरलेल्यांसाठी चांगली बातमी; आता...

Stamp
StampTendernama
Published on

पुणे (Pune) : राज्यातील खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणी व्यवहारांत मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या एकूण रकमेवर आणि या रकमेवर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार थकबाकीत सवलत देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा थकबाकीदारांना येत्या ३१ जानेवारीपर्यंत लाभ घेता येणार आहे. कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रकमेवर आणि दंडावर ही सवलत दिली जाणार आहे.

Stamp
Nashik : रेल्वेने दिली गुड न्यूज; 'या' सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा वेग आणखी वाढणार

मुद्रांक शुल्क अभय योजनेची दोन टप्प्यांत अंमलबजावणी केली जाणार असून, यापैकी पहिला टप्पा हा ३१ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. दुसरा टप्पा हा पुढच्या वर्षी १ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झालेल्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यातदेखील सवलतीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात कमी सवलत दिली जाणार आहे.

या अभय योजनेंतर्गत १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत दस्तांसाठीच्या नोंदणीसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या मूल्यांकन रकमेपेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेली रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. शिवाय या कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कावर आकारण्यात आलेली दंडाची रक्कमसुद्धा माफ केली जाणार आहे. कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास या रक्कमेत ५० टक्के सूट देऊन, त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ केली जाणार आहे.

Stamp
देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; या विभागात लवकरच 15 हजार पदांची भरती

याशिवाय १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत नोंदणी केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार असून, नाममात्र दंड आकारला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्तेच्या हस्तांतराबाबत दस्त हा कोणत्याही रकमेच्या मुद्रांक पेपरवर झालेला असणे अनिवार्य आहे. या योजनेसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

अर्ज कुठे कराल?

या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती ही नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संपर्क कुठे करावा?

या योजनेमध्ये सहभागी होऊन मुद्रांक शुल्क थकबाकीत सवलत घेण्याबाबत नागरिकांना तांत्रिक अडचण आल्यास, त्यांनी संबंधित जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विशेष नियंत्रण कक्षाशी ८८८८००७७७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com