पुणे (Pune) : घोरपडी येथील रेल्वे फाटक परिसरातील नियोजित उड्डाणपुलासाठी (Ghorpadi Flyover) महापालिकेने ४७ कोटींची तरतूद केली असून, या कामाला संरक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे.
उड्डाणपुलाचे काम व त्यासाठी होणाऱ्या खर्चाला पूर्वगणन समितीने मान्यता दिली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. मुंढवा, खराडी आणि मगरपट्टा येथून घोरपडीमार्गे पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती भागात सकाळी जाणाऱ्यांची, तर सायंकाळी शहरातून घोरपडीमार्गे मुंढवा, खराडी आणि मगरपट्टा परिसरात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.
नागरिकांना घोरपडीतून पुढे जाण्यासाठी जवळचा हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परिणामी मिरज मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच मालगाड्यांची संख्या वाढल्याने फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागतात. या भागातील नागरिकांकडून गेल्या ३० वर्षांपासून उड्डाणपुलाची मागणी केली जात होती.
उड्डाणपुलाच्या कामासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. या कामासाठी संरक्षण विभाग व रेल्वेच्या जागेची आवश्यकता होती. संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर मान्यता मिळाली. आता रेल्वे प्रशासनाकडूनही लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
घोरपडीमधील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल करावा, अशी मागणी होती. त्यानुसार, महापालिकेकडून हा पूल उभारण्यात येणार असल्याने घोरपडीवासीयांना हा मोठा दिलासा आहे. उड्डाणपुलामुळे केवळ घोरपडीच नव्हे, तर मुंढवा, खराडी, मगरपट्टा परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे.'
- चंद्रकांत खुणेकरी, रहिवासी, घोरपडी
उड्डाणपुलाची गरज
- मिरज मार्गावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या : ६४
- घोरपडी रेल्वे क्रॉसिंग येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या : २० ते २५ हजार
- नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित