पुणे (Pune) : पुणे विमानतळाची (Pune Airport) धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे. एक हजार ६६७ फुटांनी धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणेकरांना थेट अमेरिका, युरोप गाठता येईल. शिवाय हा प्रवास विनाखंडित होणार आहे. या कामासाठी हवाई दलासह खासगी मालकीच्या जागेचे संपादन करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी हवाई दल आणि पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही झाली आहे. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन टर्मिनलची पाहणी केली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भूसंपादनाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २० टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए प्रत्येकी १० टक्के खर्च करणार आहे.
धावपट्टीवाढीचे गणित
विश्रांतवाडीतून विकफिल्ड चौकामार्गे लोहगावकडे जाणारा रस्ता धावपट्टीच्या वाढीसाठी महापालिकेकडून हवाई दलाला देण्यात येणार आहे. नागरिकांना लोहगावला जाण्यासाठी विश्रांतवाडीतील ५०९ चौकाजवळील हवाई दलाच्या जागेतून गॅरिसन इंजिनिअर येथून खाणीजवळून रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे लोहगाववरून विमाननगरकडे जाताना प्रवासाचे अंतर काही प्रमाणात वाढणार आहे. लोहगावकडून विश्रांतवाडी, येरवड्याकडे येणाऱ्या व यामार्गे लोहगावकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्त्याची सोय होणार आहे.
पुणे विमानतळ धावपट्टी
- सध्या धावपट्टीची लांबी : ८,३३३ फूट (२.५३ किलोमीटर)
- वाढ झाल्यानंतर धावपट्टीची लांबी : १०,००० फूट (३.४८ किलोमीटर)
- धावपट्टीची होणारी वाढ : १,६६७ फूट (०.५० किलोमीटर)
धावपट्टीचा असा होईल फायदा
- सध्या पुणे विमानतळावर बोइंग ७३७, एअरबस ए ३१९, ए -३२० , ए -३२१, डॅश ८ व एम्बरेर इआरजे यासारख्या विमानांची वाहतूक होते.
- याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. तसेच या विमानांद्वारे विनाखंडित दूरचा प्रवास करणे शक्य नाही.
- परिणामी पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय सेवा मर्यादित आहे.
- धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर मात्र एअरबस -३५०, बोइंग -७८७ (ड्रीम लायनर) यांसारख्या मोठ्या विमानांची वाहतूक होईल.
- या विमानांची प्रवासी क्षमता २२० ते ४०० इतकी आहे.
- या विमानांतून पुणेकरांना थेट अमेरिका, युरोप गाठता येईल. शिवाय हा प्रवास विनाखंडित होणार आहे.
धावपट्टीचा विस्तार करण्यासाठीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. काही प्रमाणात खासगी जमिनींचेदेखील संपादन करावे लागणार आहे. धावपट्टीचे काम हवाई मंत्रालयाने करावे तसेच यासाठीच्या खर्चाचा भार उचलावा, यासाठी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती करणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री