पुणे (Pune) : प्रवाशांना दिवाळीच्या काळात गावी जाता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून नागपूर, हजरत निजामुद्दीन, दानापूर, गोरखपूर आणि सावंतवाडी या पाच मार्गांवर विशेष गाड्या धावतील. या गाड्यांच्या एकूण ८८ फेऱ्या होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल
२५ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. हजरत निजामुद्दीनहून ही गाडी दर शनिवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक
२६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दर शनिवारी नागपूरहून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. पुण्याहून दर रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी गाडी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आदी स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
पुणे-दानापूर-पुणे
२५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी रोज पुण्याहून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती तिसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता दानापूरला पोहचेल. दानापूरहून ही गाडी पहाटे पाच वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आदी स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.
पुणे-गोरखपूर-पुणे स्पेशल
२२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी पुण्यातून रोज सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता गोरखपूरला पोहचेल. गोरखपूरहून ही गाडी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती तिसऱ्या दिवशी मध्यरात्री तीन वाजून १५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनौ, गोंडा, बस्ती आदी स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
पुणे-सावंतवाडी रोड-पुणे एसी स्पेशल
२२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दर मंगळवारी पुण्याहून सकाळी नऊ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ती रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहचेल. ही गाडी सावंतवाडी रोडवरून दर बुधवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.