पुणे (Pune) : तुम्ही नोकरी करत आहात, पण देशसेवेसाठी लष्करात जाण्याची इच्छा आहे... तर मग इकडे लक्ष द्या! नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी लष्करात दाखल होण्याची संधी भारतीय लष्कराकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सैन्यदलाच्या प्रादेशिक सेना म्हणजेच ‘टेरिटोरियल आर्मी’मध्ये भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याद्वारे लष्करात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी अनेकांना मिळणार आहे.
प्रादेशिक सेनेने अधिकारीपदासाठी भरती प्रक्रियेशी निगडित अधिकृत संकेतस्थळावर सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोणतीही पदवी असलेल्या मात्र नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सैन्यदलात दाखल होत देशसेवा बजावता येणार आहे. ही प्रक्रिया महिला व पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी असून, यात १९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखती अशा दोन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही १८ ते ४२ वर्षे अशी आहे.
देशातील तरुणांना त्यांच्या प्राथमिक नोकरी किंवा व्यवसायाचा त्याग न करता लष्करात सेवा करण्यास सक्षम करण्याच्या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया आहे. यामुळे लष्कराचे गणवेश परिधान करत देश सेवेची जबाबदारी पार पाडण्याचा अनुभवदेखील या तरुणांना मिळणार आहे. या प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.
अर्ज करण्यासाठी या गोष्टी आवश्यक
- कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
- भारताचे नागरिकत्व आवश्यक
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात ः २३ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख ः २१ नोव्हेंबर २०२३
लेखी परीक्षा ः डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात